Join us

जनावरांतील गोचीडांचे नियंत्रणासाठी उपाययोजना

By बिभिषण बागल | Published: September 14, 2023 12:23 PM

गोचीड जनावरांचे रक्त शोषतात, तसेच त्यांच्या शरीरात विषारी द्रव सोडतात. यांच्यामार्फत अतिशय जीवघेण्या आजारांच्या जंतूंचा जनावरांच्या शरीरात प्रसार होतो. परिणामी जनावरांची उत्पादन क्षमता क्षीण होत जाते. गोठ्यामध्ये ७० टक्के तर जनावरांनर १० ते २० टक्के गोचिड आढळतात.

जनावरांच्या शरीरावर आणि शरीरांतर्गत बरेच परोपजीवी सहज आढळून येतात. यामध्ये काही सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि काही आपल्या डोळ्यांनी दिसतील एवढे मोठे असतात. काही सहा पायांचे कीटक वर्गीय पंख असलेले किंवा पंख विरहित, काही कृमी, अळी सारखे जंतवर्गीय तर काही एक पेशीय परोपजीवी असतात. हे परोपजीवी जनावरांना इजा पोचवून हैराण करतात. वेगवेगळ्या रोगकारक जंतूंचा जनावरांच्या शरीरापर्यंत प्रसार करतात. यापैकी महत्त्वाचा बाह्य परोपजीवी म्हणजेच कीटक वर्गीय 'गोचीड'. हे गोचीड जनावरांचे रक्त शोषतात, तसेच त्यांच्या शरीरात विषारी द्रव सोडतात. यांच्यामार्फत अतिशय जीवघेण्या आजारांच्या जंतूंचा जनावरांच्या शरीरात प्रसार होतो. परिणामी जनावरांची उत्पादन क्षमता क्षीण होत जाते. गोठ्यामध्ये ७० टक्के तर जनावरांनर १० ते २० टक्के गोचिड आढळतात. आपल्याकडे जनावरांच्या अंगावर बुफीलस, हायलोओमा, अॅम्लीओमा, रिफीसीफॅलस, इत्यादी जातीचे गोचीड प्रामुख्याने दिसून येतात.

गोचिडांचा जीवनक्रमगोचिडांचे आयुष्य दोन ते तीन वर्षांचे असते. यामध्ये गोचीड विविध प्रकारच्या तीन जीव अवस्थेमधून जाते. मादी जनावरांच्या त्वचेवर रक्त शोषून वाढते आणि नराबरोबर समागम झाल्यावर खाली जमिनीवर पडून योग्य सुरक्षित ठिकाणी एकावेळी हजारो अंडी घालते. अंड्यामधून सहा पायाची अळीसदृश लारव्हा बाहेर पडते. ही अळी जनावराच्या शरीरावर चिकटते. बरेच दिवस रक्त शोषून मोठी होते आणि परत जमिनीवर पडते. दोन आठवडे उलटल्यावर तिसऱ्या निम्फ अवस्थेमध्ये परावर्तित होते. या अवस्थेमध्ये परत जनावराच्या शोधात राहून त्वचेवर चिकटते. निम्फ अवस्थेमधून नंतर मोठ्या गोचीड अवस्थेमध्ये रुपांतरीत होते. भरपूर रक्त शोषून मोठे होऊन परत समागम होतो. यानंतर नराचा मृत्यू होतो, मादी अंडे दिल्यानंतर मरण पावते. अशाप्रकारे हे जीवन चक्र सुरु राहते.

गोचीड प्रादुर्भावाची लक्षणेरक्तक्षय (अॅनेमिया) गोचीड जनावरांच्या कातडीवर चिकटून बसतात. आपली सोंड त्वचेत खुपसून जनावरांचे रक्त शोषतात.दोन आठवड्यात एक गोचीड २ मिलि पेक्षा जास्त रक्त पिते. यामुळे जनावरांमध्ये रक्तक्षय होऊन अशक्तपणा येतो.

त्वचेची इजागोचिडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या त्वचेमध्ये सूक्ष्म स्वरूपाच्या जखमा होतात.खाज सुटल्यामुळे जनावर टोकदार वस्तूवर अंग घासते. त्यामुळे जखमा होऊन कातडीचे बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य त्वचारोग होतात. जखमा होऊन माशी बसल्यामुळे किडे पडतात.

पॅरालीसीसगोचीड रक्त शोषण्यापूर्वी त्वचेमध्ये सोंडेतील स्त्राव ओकून मग रक्त पितात. या स्त्रावामुळे विषबाधा तसेच प्रचंड खाज सुटते. विषबाधेमुळे काही जनावरांमध्ये 'पॅरालीसीस' झालेला दिसतो.

विविध आजारगोचिडांद्वारे जनावरांच्या शरीरात ओकलेल्या स्त्रावामध्ये काही अतिशय गंभीर आजार निर्माण करणारे एकपेशीय जिवाणू आणि रक्त आदिजीव (हिमोप्रोटोझोआ) रक्तामध्ये सोडले जातात. यामुळे रक्तातील पेशींना संसर्ग होऊन अतिशय गंभीर असे थायलेरीयासीस, बॅबेसीआसीस, एनाप्लासमोसिस, ऐहरलीश्चियासीस इत्यादी आजार होऊन जनावरे दगावतात. या आजारांचे प्रमाण सध्या आपल्या देशातील संकरित तसेच देशी जनावरांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात दिसते. गोचीड प्रादुर्भाव झालेले जनावर खंगू लागते. त्यांची शारीरिक क्षमता आणि उत्पादकता कमी होत जाते. दुर्लक्ष झाल्यास असे जनावर दगावू शकते. अधिक श्रम आणि ताण यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन इतर विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य संसर्गजन्य जीवघेणे आजार होतात.

जनावराच्या अंगावरील गोचिड नियंत्रण- नियंत्रणासाठी विविध रासायनिक गोचिड नाशके वापरली जातात. आता वनस्पतिजन्य अतिशय सुरक्षित गोचिडनाशके उपलब्ध आहेत. यांचा पशूतज्ञांच्या सल्याने वापर करावा.- वेगवेळ्या कंपनीची वेगवेगळी गोचिडनाशके जनावरांच्या अंगावर लावण्यासाठी किंवा फवारण्यासाठी उपलब्ध आहेत. यांचे योग्य मात्रेतील द्रावण वापरावे. कमी जास्त प्रमाण वापरल्यास ते असुरक्षित किंवा निरुपयोगी सिद्ध होते.गोचिडनाशकांच्या वेष्टनावर (बाटली+बॉक्तीस) वर कशी वापरायची याची आणि विषबाधा झाल्यास घेण्याची काळजी इत्यादी विषयी सखोल माहिती असते, त्याप्रमाणेच काळजीपूर्वक ही गोचिडनाशके जनावराच्या अंगावर फवारणे आवश्यक असते.- गोचिडनाशकांचा वापर व जनावरांचे तोंड, डोळे आणि योग्य पद्धतीने झाकलेले असावे. हातमोजे वापरणे बंधनकारक असते.- पशुतज्ञांच्या सल्ल्याने निलगिरी तेल, कडुलिंबाचे तेल, करंज तेल एकत्रित करून त्याचा फवारा जनावरांच्या अंगावर आणि परिसर सुरक्षेसाठी वापरता येतो. जनावराच्या त्वचेखाली आणि तोंडातून देण्यासाठी काही गोचिडनाशके आहेत. पशू तज्ञांच्याकडून यांचा वापर करावा.

गोचिड बाधेवर उपचार आणि नियंत्रण - गोचीड जनावरांच्या अंगावर वाढतात, परंतु त्यांचा जीवनक्रम पाहिला तर त्यामध्ये काही काळ ते जनावराच्या शरीरापासून दूर सुरक्षित ठिकाणी जमीन किंवा भिंतीमध्ये लपून वाढतात. त्यामुळे नियंत्रण करण्याचा विचार केल्यास फक्त जनावरावर उपचार करून भागत नाही. सर्वकष स्वरूपाची उपाय योजना करावी लागते.- गोचिडाचा जीवनक्रम पाहिल्यास त्यांचा समूळ नायनाट करणे कदापि शक्य नाही. परंतु दक्ष राहून त्यांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. सुदृढ जनावरांमध्ये गोचीड प्रादुर्भाव अशक्त जनावरांपेक्षा कमी दिसतो. त्यामुळे जनावरे निरोगी राहतील याकडे लक्ष द्यावे.- जनावरांचा आहार सकस आणि पूरक असावा. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी दैनंदिन खरारा करणे, त्यांना धुवून काढ आणि स्वच्छ ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.- जनावरांना इतर आजार होऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ नये म्हणून सगळ्या आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.- शरीरांतर्गत असलेल्या जंतांचे प्रतिबंधात्मक निर्मुलन करावे.- गोठ्यातील माती, साठलेले मलमूत्र, घाण, भिंतीतील छिद्र, गव्हाणीमध्ये दगड विटा, मॅट इत्यादी खाली लपण्यास योग्य ठिकाणे असल्याने यामध्ये लपलेल्या गोचीड आणि त्यांची अंडी यांचे निर्मुलन करावे.- चरायला जाणाऱ्या जनावरांच्या अंगावर गवतावरील गोचिडीचे लाव्हा आणि निम्फ अवस्था चिकटून येतात. त्यामुळे चरण्याच्या ठिकाणी आणि पाणवठ्यावर असणाऱ्या गोचिडांचा प्रादुर्भाव देखील नियंत्रित करणे क्रमप्राप्त असते.

इतर आवश्यक काळजी- गोचिड प्रादुर्भाव झालेल्या गोठ्यातील शेण, मूत्र मिश्रित माती पूर्णपणे खरडून घ्यावी. त्यानंतर चुना पावडर शिंपडावी. गोठ्यातील जमिनीवर दिवसातील काही काळ ऊन पडेल आणि जमीन कोरडी होईल याचे नियोजन करावे.- जमिनीवरील दगड, विटा, मॅट इतर साहित्य उचलून त्याच्या खाली स्वच्छता करावी. गरम पाण्याने जमीन धुवून घ्यावी. गोठ्यातील जमिनीवरील भेगा, खड्डे, छिद्र बुजवून वर नमूद केलेली रासायनिक आणि हर्बल गोचिडनाशकांचे द्रावण प्रभाव मात्रेमध्ये शिंपडावे.- गोठ्याच्या भिंतीला, गव्हाणीला चुना लावावा. भेगा, खड्डे, छिद्र बुजवावे. शक्य असल्यास भिंती आगीच्या बंदुकीने (फ्लेम गन) जाळून घ्याव्यात. तसेच वर नमूद केलेली रासायनिक आणि हर्बल गोचिडनाशक द्रावण प्रभावी मात्रेमध्ये फवारावे.- नवीन जनावर कळपात आणण्या अगोदर काही दिवस वेगळे बांधावे. निरोगी सिद्ध झाल्यावर कळपात सोडावे.- नवीन जागेवर जनावर नेले असल्यास परत कळपात सोडण्याआधी गोचीड निर्मुलन करून सोडावे.- चरायला जाणाऱ्या जनावरांचा दररोज खरारा करून मगच गोठ्यात बंदिस्त करावे. गोठ्यामध्ये देशी कोंबड्यांचा वावर असेल तर प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.- चारा, पिके, कुरण इत्यादीवर वनस्पतिजन्य गोचिडनाशकांची फवारणी करावी. गोठ्यामध्ये जैवसुरक्षा यंत्रणा राबवावी.

डॉ. प्रशांत पवारपशुपरोपजीवी शास्त्र विभागडॉ. स्मिता आर. कोल्हे संशोधन प्रकल्प प्रमुखक्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा

 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीदूध