रविंद्र शिऊरकर
चारा टंचाई, पाणी टंचाई, दुधाच्या दरात झालेल्या उतारमुळे शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची विक्री वाढली असून जनावरांच्या बाजारात कवाडीमोल दरात जनावरांना शेतकरी विकताना दिसून येत आहे .
आज सोमवार (दि.२०) अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात बघावयास मिळाली. मात्र त्या तुलनेत खरेदीदार बाजारात उपलब्ध नसल्याने अगदी कवडीमोल किंमतीत जनावरांची खरेदी विक्री होत आहे. ज्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.
मागील महिनाभरापासून राज्यातील दूधाच्या घसलेल्या किंमतींमूळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. दूध उत्पादक शेतकरी यांना दूध संकलन केंद्राद्वारे दुधाचे दर कमी होत असताना राज्यात यंदा पाणीटंचाई परिणामी चारा टंचाईचा एकत्र परिणाम जनावरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांवरही होत असल्याचे चित्र आहे.
संबंधित: चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा
यंदा राज्यात सरासरीहून कमी पाऊस झाला परिणामी पिकांचे मोठे नुकसान झाले. विहिरी, शेततळे कोरडेठाक पडले. परिणामी जनावरांना जगवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. काहींनी जनावरे सोडून देण्याचा मार्ग निवडला तर काहींनी जनावरे विकण्याचा. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगाम पेरण्यांचा खर्च काढायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असताना चारा आणि पाणीटंचाईमुळे दुभती जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातही शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत असल्याचे चित्र आहे.
दुध दरात घसरण; किलोमीटरवर दुधाच्या दरात फरक
आधीच उत्पन्न कमी त्यात पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी वणवण करावी लागते की काय या भितीने आता शेतकरी एक किंवा दोन दुधाळ जनावरे राखून उर्वरित जनावरांची विक्री करत आहे. ज्यामुळे बैल, गाय, म्हैस आदींची गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात विक्री वाढल्याचे दिसून येत आहे.
साधारण २० लिटर दूध देणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या वेताच्या गायीला पंधरा दिवसांपूर्वी मिळालेला दर १ लाखांहून अधिक होता. आज हा दर ३० ते ४० हजारांना घटला आहे. आज या गायीची ७० ते ९० हजारांदरम्यान विक्री होत आहे. त्यामूळे आधिच हतबल झालेल्या शेतकऱ्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. - छबूराव थोरात ( जनावरांचे व्यापारी रा. चितळी श्रीरामपूर)
दूध दरात घसरण कायम; शेतकरी चिंतेत
पशुपालक नाराज
खाजगी व सहकारी संघांनी शनिवारी एक रुपयांनी गाईच्या दूध दरात कपात केली आहे. २६ रुपये लिटरने गाईचे दूध आता खरेदी केले जात आहे. मागील नऊ महिन्यांत दूध दरात घसरण कायम राहिली आहे. सुरू असलेल्या दर घसरणीमुळे एप्रिलपासून आतापर्यंत १२ रुपयांची कपात झाली. दरम्यान, या तुलनेत ढेप आणि इतर उत्पादन शुल्क वाढलेलेच आहेत. राज्य शासनाकडून दूध उत्पादकांना अनुदानदेखील दिले जात नसल्याने पशुपालक नाराज आहेत.