Dudh Anudan : एकीकडे बुलढाणा जिल्ह्यातील ९१ टक्के दुधउत्पादकmilk production संस्था अवसायनात असल्याने जिल्ह्यातील दुग्धोत्पादनाची स्थिती चिंताजनक आहे. त्यातच दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना गायीच्या दुधाच्या प्रतिलिटर मागे पाच रुपये अनुदान दिल्याने दिलासा मिळाला असून, जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ४ लाख १३ हजार ७१० रुपयांचे अनुदान १९३३ शेतकऱ्यांना मिळाले आहे.
वाढती महागाई, त्यामुळे पशुखाद्य, ढेप, वैरणाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. खासगी दूध उत्पादक संघाकंडून अपेक्षित भावही शेतकऱ्यांना मिळत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर राज्यात मध्यंतरी शेतकऱ्यांनी आंदोलनेही केली होती. त्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतांना पशुपालकांसाठी ही दिलासा देणारी घोषणा केली होती.
१ जुलैपासून हे अनुदान मिळेल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, डोमरुळ येथील दूध उत्पादक शेतकऱ्याला या अनुदानापोटी अवघे ९० रुपये मिळाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील दुग्धोत्पादकांची स्थिती जाणून घेतली असता आतापर्यंत १ कोटी ४ लाख १३ हजार ७१० रुपयांचे अनुदान १९३३ दुग्धोत्पादन करणाऱ्यां शेतकऱ्यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्यापही मदर डेअरीच्या ७३८ आणि संग्रामपूरमधील सरस्वती मिल्क प्रोडक्टचे १०६ व देऊळगाव राजा येथील ४ दूध उत्पादकांच्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
दूध उत्पादक संस्थांची अवस्था बिकट
* दुसरीकडे जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांची अवस्था अत्यंत बिकट अशी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय दूध योजनेतंर्गत दूध संकलन बंद आहे. नोंदणी झालेल्या जिल्ह्यातली ५८० पैकी ५०८ संस्था या २०१८ मध्येच बंद पडल्या आहेत.
* २०२३ मध्ये त्यात २२ संस्थांची भर पडली होती. थोडक्यात जिल्ह्यातील ९१ टक्के दूध उत्पादक संस्था अवसायनात निघाल्या आहेत. उर्वरित ५४ प्राथमिक सह दूध संस्थांविरुद्ध अवसायनाचे अंतरिम आदेशही जारी केले गेले होते. परंतू त्यास शासनाने स्थगिती दिल्याचे सुत्रानी 'लोकमत ऍग्रो'शी बोलतांना सांगितले. त्यामुळे तुर्तास जिल्ह्यात ५८ संस्था असून, दोन दूध संघ कार्यरत आहेत.
डेअरी क्षेत्रात २६ कोटींपेक्षा अधिक पतपुरवठा
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात डेअरी क्षेत्रात २६ कोटी रुपयांपेक्षा अधिक पतपुरवठा वित्तीय संस्थानी केला आहे. २०२२-२३ ची आकडेवारी मात्र अद्याप शासनस्तरावर उपलब्ध झालेली नाही; परंतू चार वर्षाचा विचार करता हा पतपुरवठा अधिक असल्याचे सांगण्यात येते. २०२१-२२ मध्ये तब्बल १६ कोटी ११ लाख रुपयांचा पतपुरवठा या क्षेत्रात झाला होता.
जिल्ह्यात खासगी संस्थांकडूनच दूध संकलन
जिल्ह्यात मदर, अमर, ग्रीनप्लस प्रोड्यूसर अशा काही संस्थांकडून जिल्ह्यातून वर्तमान स्थितीत सुमारे ३७ हजार १०० लिटरच्या आसपास दुधाचे संकलन होत आहे. गेल्या दोन तपापासून जिल्ह्यातील शासकीय दुधसंकलनालाच मोठा खो बसलेला आहे.
याप्रमाणे मिळले अनुदान
मलकापूर येथील मदर डेअरीअंतर्गत ३२९ दुध उत्पादकांना १२ लाख ९८ हजार ३१० रुपयांचे अनुदान वितरीत केले गेले आहे. दुसरबीड येथील ग्रीन पर्ल डेअरीतील ३२ दुध उत्पादकांना १ लाख ३० हजार ४१० रुपयांचे तर बोदवड येथील अमर डेअरीला दुध देणाऱ्या दुध उत्पादकांना ९० लाख २६ हजार २८० रुपयांचे अनुदान आतापर्यंत मिळाले आहे.