देवराष्ट्रे : दुधापेक्षा पशुखाद्य व चारा महाग झाल्यामुळे दूधव्यवसायाचा नुसता आर्थिक फुगवटा निर्माण होतो. मात्र, प्रत्यक्ष दूध उत्पादकांच्या जवळ काहीच उरत नाही.
गेल्या दहा वर्षांत दूध दरात चार टक्के वाढ झाली असून, पशुखाद्य दरात मात्र २५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' असे म्हणण्याची वेळ दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
दूध दराचे धोरण हे आंतरराष्ट्रीय दूध पावडरच्या भरवशावर अवलंबून असते. त्यामुळे दुधाचे दर कधी वाढतील व कधी पडतील याचा अंदाज भल्याभल्यांना सांगता येत नाही. मात्र, दराच्या कमी जास्त वाढीमुळे दूध उत्पादकांची मात्र भरड होते.
उत्पादन खर्च जास्त व दुधाला मिळणारा दर कमी यामुळे दूध व्यवसाय नफ्यावर न चालता तोट्यात आहे. सध्या गाय दुधाचा दर प्रति लिटर ३० रुपयांच्या घरात गेला असला तरी पशुखाद्य मात्र ते ३० ते ३५ रुपये किलोपर्यंत गेले आहे.
दूध संघांची पॅकिंग विक्री किंमतगाय दूध प्रति लिटर विक्री ५२ ते ५६ रुपये तर म्हैस दूध प्रति लिटर विक्री ६६ ते ७५ रुपये आहे.
पशुखाद्याचे दर
पशुखाद्य | सध्याचे दर | १० वर्षांपूर्वीचे दर |
सरकी | ३३ रु. किलो | २० रु. किलो |
गोळी पेंड | ३५ रु. किलो | २२ रु. किलो |
गहू भूसा | २८ रु. किलो | १७ रु. किलो |
मका चुणी | ३२ रु. किलो | १५ रु. किलो |
शेंगदाणा पेंड | ५० रु. किलो | ३२ रु. किलो |
उडीद काळना | २५ रु. किलो | १२ रु. किलो |
लहान वासरांचे खाद्य | ३७ रु. किलो | २२ रु. किलो |
कडबा कुट्टी | १३ रु. किलो | ५ रु. किलो |
अधिक वाचा: गाई व म्हैशीतील लाल लघवीचा आजार कशामुळे होतो? काय कराल उपाय?