मागच्या चार-पाच महिन्यांपूर्वी किलोला पावणेदोनशेच्या आसपास दर मिळत असलेल्या खव्याला आज केवळ सव्वाशे रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे दूध प्रकल्पाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्देशाप्रमाणे दर मिळत नसल्याचा एकीकडे कोलाहल सुरू असतानाच, दुसरीकडे खवा भट्टयांना दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांच्या अर्थकारणावर विरजण पडले आहे.
दुष्काळी आत्महत्याग्रस्त व असा शेतकरी शिक्का पडलेल्या कळंब तालुक्यात शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रपंचाला दुग्ध व्यवसायाचा मोठा हातभार लागत आहे. यातूनच तालुक्यात विविध दूध संकलन व प्रक्रिया उद्योगांनी जम बसवला आहे. या प्रकल्पाशी हजारो पशुपालक जोडले गेले आहेत. याशिवाय या दूध संकलन यंत्रणेला पर्याय म्हणून विस्तारलेल्या खवा उत्पादन व्यवसायाचेही तालुक्यात चांगलेच बस्तान बसले आहे. येरमाळा, इटकूर, कळंब, मस्सा मंडलातील दुधाळवाडी, बांगरवाडी, आडसूळवाडी, गंभीरवाडी, रत्नापूर, मलकापूर, उपळाई, भोगजी, कोठाळवाडी आदी गावांत खवा भट्टया चालतात, येथे खव्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. येथे तयार होणारा खव्याला अनेक मोठ्या शहरातही मोठी मागणी आहे. परंतु, सध्या दुधापाठोपाठ खव्याचेही दर घसरल्याने हे उत्पादकही अडचणीत आले आहेत.
बालाघाटचा खवा, सर्वांना हवा...
कळंब, वाशी भागातील खव्याला बड्या शहरांत मोठी मागणी आहे. येथील पशुधनाला खाद्य म्हणून कोरडा चारा असतो, शिवाय पशुधनाची भटकंती होते. यामुळे दुधाला चांगला कण असतो. यामुळे त्यास मंद आचेवर आटवून तयार झालेला खवा खमंग, विशिष्ट असा चवीचा असतो. बर्फी, जामुन, पेढा, कलाकंद यासाठी येथील खवा चांगलाच भाव खातो.
खवा भट्टयात दूध, अर्थकारण आतबट्ट्यात
मागच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यात खव्याला समाधानकारक भाव होता, पावणेदोनशेच्या घरात दर मिळत असल्याने खवा भट्टयांना दूध घालणाऱ्या पशुपालकांना लिटरला 'डेअरी' प्रकल्पापेक्षा चांगला भाव मिळत होता, मात्र, महिनाभरापासून खव्याच्या दराचा आलेख उतरता राहिला आहे. सध्या दूध उत्पादकांना किलोला १२० ते १३० रुपये, तर भट्टीचालकांना १५० च्या आसपास दर मिळत आहे. यामुळे लिटरच्या हिशेबाने गायीला २० ते २२, तर म्हशीच्या दुधाला ३२ ते ३८ रुपयांचा दर मिळत असल्याने अर्थकारण तोट्यात आले आहे.
हजारो किलोंचे उत्पादन, अन् तेवढीच विक्री
तालुक्यात व लगतच्या वाशी भागात दररोज हजारो किलो खव्याचे उत्पादन होते. कळंब, वाशी, सारोळा, पारा, येरमाळा येथे ठोक व्यापार होतात. येथे गावोगावच्या खवा भट्टयांचा माल संकलित होतो, तेथून पुणे, बंगलोर, हैद्राबाद, गुलबर्गा येथे जातो.
दिवाळी, रक्षाबंधनला उपरोक्त भागातून सहासात तर सध्या दोनतीन टनांच्या आसपास खवा पाठवला जातो.
असे आहे अर्थकारण...
एक किलो खवा तयार करण्यासाठी गायीचे ५ ते ५.५ लिटर तर म्हैसीचे ३.५ ते ४ लिटर दूध आटवावे लागते किवा एका लिटर गाईच्या दुधापासून १७० ते १९० ग्रॅम तर म्हैसीच्या दुधापासून २०० ते २२० ग्रॅम खवा तयार होतो. एकूणच सध्याच्या खवा दरानुसार गाई दुधाला २१ ते २४ तर म्हैस दुधास ३२ ते ३६ रूपये दर भेटत आहे.