आता पशुपालकांना पावसाळ्यात सर्वच आपल्या उत्पादित दुधाला फॅट योग्य लागत नाही, कमी लागते त्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही म्हणून त्याची ओरड सुरू असते.
अनेक बाबी मुळापासून समजावून न घेतल्यामुळे दूध संस्थेत भांडण करणे, दुधाचे फॅट काढायच्या मशीन बाबत शंका व्यक्त करणे, वारंवार डेअरी बदलणे अशा अनेक घटना घडत असतात ऐकायला मिळतात. यासाठीच मुळात फॅट या घटकाबद्दल आपण जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
कोणत्याही जनावराचे फॅट हे आनुवंशिक असते. त्यामध्ये फार मोठा बदल आपल्याला करता येत नाही. म्हणूनच फॅटच्या प्रमाणावर दुधाला दर दिला जातो. दूसरे असे की ज्या जनावराचे दूध उत्पादन जास्त त्या जनावराच्या दुधाला फॅट कमी लागते.
ज्या जनावरात दूध उत्पादन कमी असते त्याच्या दुधाला फॅट जादा लागते. अपवाद फक्त जनावर ज्यावेळी माजाला आले असते त्यावेळी दूध उत्पादन घटते आणि त्याचवेळी फॅट देखील कमी लागते. यावरून आपल्या लक्षात आले असेल की होल्स्टन फ्रीजिअन (एच एफ) याच्या जातीच्या गाईचे दूध उत्पादन जास्त असते व फेंट कमी असते.
गाईचे दूध उत्पादन तुलनेने कमी असते व फॅट जास्त असते. जाफराबादी म्हशीचे तुलनेने फॅट जास्त असते. आपल्या राज्यात भदावरी नावाच्या म्हैशीची जात आहे. त्याचे फॅट हे सर्वात जास्त म्हणजे १४ ते १८ टक्के असते.
एकूणच प्रत्येक वेताला साधारण ०.३ टक्के फॅट हे कमी होत जाते. वय आणि वेत वाढत जाईल तसे फॅट कमी होत जाते. साधारण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वेतापर्यंत ते स्थिर असते. त्यानंतर मात्र हळूहळू कमी होत जाते.
व्याल्यानंतर जसं जसं दूध वाढत जातं तसं तसं फॅट कमी लागतं. आणि शेवटी ज्यावेळी दूध कमी होत जातं त्यावेळी परत फॅट वाढतं हे आपण सर्वजण अनुभवत असतो. दूध काढण्याच्या वेळा देखील दुधाच्या फॅट वर परिणाम करत असतात, साधारण बारा बारा तासाच्या फरकाने दूध काढल्यास फॅट हे स्थिर राहते.
त्यामध्ये फरक पडला तर मात्र फॅट कमी होते. अंतर वाढवले की उत्पादन वाढतं पण फेंट कमी होते. म्हणून बारा तासापेक्षा जास्त वेळ कासेत दूध राहता कामा नये याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.
धारा काढताना सुरुवातीच्या दुधात फॅट कमी असते. ते घरी वापरायला हरकत नाही. जेणेकरून आपले आरोग्य देखील चांगले राहील. नंतरचे दूध डेअरीला घालावे. त्याला चांगले फॅट लागते.
धारा काढताना देखील सुरुवातीला वासरू किंवा रेडकू पाजावे नंतर मात्र कास पूर्ण मोकळी होईपर्यंत धार काढावी. त्यामध्ये जादा फॅटचे प्रमाण असल्यामुळे देखील चांगला दर मिळू शकतो. धारा काढताना जनावर पूर्णपणे पान्हावले जाईल याची काळजी घ्यावी.
एवढेच काय दूध काढताना, रवंथ करताना फार मोठा आवाज झाला, मोटारीचे हॉर्न वाजले, फटाके वाजले तरी देखील फॅट कमी लागते. दुधाळ जनावरांना हलका व्यायाम मिळाला तरी फॅटच प्रमाण वाढतं. जनावरांना पोषक आहाराबरोबर नियमित खनिज मिश्रणे देखील द्यायला हवीत. त्यामुळे देखील फॅटच्या प्रमाणामध्ये सातत्य राहते आणि आपल्याला फायदा होतो.
पशुधनाचा आहार महत्त्वाचा• दुधाच्या फॅट वर आपण देत असलेल्या आहाराचा देखील परिणाम होतो.• पावसाळ्यात आपण भरपूर कोवळा, हिरवा चारा देत असतो. त्यामधे तंतुमय पदार्थ कमी व पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फॅट कमी लागते, त्यासाठी आपण नियमित हिरव्या चाऱ्यांबरोबर वाळलेला चारा म्हणजे कडबा देणे आवश्यक आहे.• त्यामध्ये २८ ते ३१ टक्के तंतुमय पदार्थ असतात. म्हणून एकूण आहाराच्या ६० ते ६५ टक्के वाळलेला चारा विशेष करून कडबा असावा, असे केल्याने पावसाळ्यात देखील आपल्या उत्पादित दुधाला चांगले फेंट लागून चांगला दर मिळू शकतो.• जाता जाता दुधात पाणी घातल्याने, दूध भुकटी घालून दुधाचे प्रमाण वाढवल्याने दूध घट्ट होऊ शकते पण फॅट कमी लागते हे लक्षात ठेवून आपण आपले नियोजन केल्यास दुग्ध व्यवसायातून चांगला नफा मिळू शकेल.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन
अधिक वाचा: अधिक प्रमाणात हिरवा लुसलुशीत चारा जनावरांना कसा ठरू शकतो घातक