कोल्हापूर : गायीच्या दुधाच्या अनुदानासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील माहिती भरण्यासाठी राज्य शासनाने मंगळवार (दि. ३०) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वंचित शेतकऱ्यांनी दूध संघांच्या माध्यमातून ही माहिती भरायची असून, ही शेवटची संधी राहणार आहे.
जिल्ह्यातील सरासरी ४७ हजार ८८२ शेतकऱ्यांना २० कोटी ३७ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. गायीच्या दुधाच्या दरात घसरण झाल्याने राज्य शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतला होता. ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीसाठीही अनुदान देण्यात आले आहे.
यासाठी शासनाच्या अॅपद्वारे पशुधन, दुधासह इतर माहिती भरायची होती. पशुधन टॅगींग असणे बंधनकारक असल्याने अनेक दूध उत्पादकांची अडचण झाली होती. 'गोकुळ' दूध संघाने प्राधान्याने हे काम केल्याने त्यांच्या ३९ हजार शेतकऱ्यांना १४ कोटी ३६ लाख रुपये अनुदानाचा लाभ मिळाला आहे.
त्या पाठोपाठ वारणा दूध संघाच्या ६९०२ शेतकऱ्यांना ३ कोटी ७० लाख रुपये अनुदान मिळाले. अद्यापही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. माहिती नमुन्यात न भरल्याने त्यांची नावे पात्र ठरलेले नाहीत. या शेतकऱ्यांसाठी मंगळवारपर्यंत नव्याने दुधाची माहिती भरता येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना वेळेत दुधाची माहिती भरता आलेली नाही. त्यांना मुदतवाढ दिली असून, आपल्या दूध संघांच्या माध्यमातून ती भरून अनुदानाचा लाभ घ्यावा. - प्रकाश आवटे (जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, कोल्हापूर)
अधिक वाचा: मराठवाडा, विदर्भात दहा हजार गायी-म्हशी देणार