जयसिंगपूर : दूध पावडर आयात केल्याने देशांतर्गत दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्या, दुधाचे दर आधीच कमी आहेत आणि अतिरिक्त दूध उत्पादनासह, दुधाच्या पावडरमध्ये रूपांतरित केल्याने या आयात निर्णयामुळे योग्य भाव मिळणार नाही, ज्यामुळे आपल्या देशांतर्गत दूध उत्पादकांच्या आर्थिक स्थिरतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
यामुळे केंद्र सरकारने दूध पावडर आयातीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
देशातील व राज्यातील दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने भेसळयुक्त दूध व दूध पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून, त्या कंपन्यामुळेच बाजारात दुधाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे.
ही परिस्थिती अशीच राहिल्यास अजूनही दर झपाट्याने घसरण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादक व ग्राहक या दोघांनाही याचा मोठा फटका बसणार असल्याचे शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.