खाजगी व सहकारी संघांनी शनिवारी एक रुपयांनी गाईच्या दूध दरात कपात केली आहे. २६ रुपये लिटरने गाईचे दूध आता खरेदी केले जात आहे. मागील नऊ महिन्यांत दूध दरात घसरण कायम राहिली आहे. सुरू असलेल्या दर घसरणीमुळे एप्रिलपासून आतापर्यंत १२ रुपयांची कपात झाली. दरम्यान, या तुलनेत ढेप आणि इतर उत्पादन शुल्क वाढलेलेच आहेत. राज्य शासनाकडून दूध उत्पादकांना अनुदानदेखील दिले जात नसल्याने पशुपालक नाराज आहेत.
अत्यल्प पावसाचे प्रमाण, पिकांना वेळेवर भाव न लागणे यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पशुपालन करत दूग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला आहे. जिल्ह्यात गाय व म्हशीचे मिळून खासगी, सहकारी दूध संघाकडे प्रतिदिवस २ लाख ३५ हजार लिटर दूध संकलित होते. यावर्षी जिल्ह्यात दूध संकलनात प्रथमच वाढदेखील झालेली आहे. परंतु, एप्रिलमध्ये ३८ रुपये प्रतिलिटर असणारे दूध, नोव्हेंबरमध्ये २६ रुपयांनी विकण्याची वेळ पशुपालकांवर आल्याने उत्पादक नाराज आहेत.