Join us

दूध दरात पुन्हा घसरण, शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:31 AM

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना पुन्हा सुरू करावी.

राज्यातील दूध भुकटीचे दर कमी झाले असल्याने दूध दरामध्ये मोठी घसरण झाली असून दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे, त्यामुळे राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी दूध संघाचे (कात्रज डेअरी) चेअरमन भगवान पासलकर यांनी मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केलेली आहे.

सद्यस्थितीत दुधाचे दर २६ ते २७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले आहेत. पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या किमती तसेच उत्पादन खर्च याचा विचार करता शेतकऱ्यांना प्रतिलिटर चार ते पाच रुपये तोटा होत आहे. त्यामुळे अनुदान देण्याचा निर्णय तत्काळ दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल, असे पासलकर यांनी राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पुणे जिल्हा दूध संघाचे सध्या सरासरी दैनंदिन गायीच्या दूध संकलनापैकी दूध पॅकिंग व दुग्धजन्य पदार्थांसाठी वापरल्यानंतर उर्वरित दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक दूध ३० रुपये दराने खासगी डेअरीला विकण्यात येत असल्याने संघास मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे किंवा शिल्लक अतिरिक्त दूध सरकारने रुपांतरणासाठी घ्यावे, जेणेकरून संघाला आणि शेतकऱ्यांना तोटा होणार नाही, अशी मागणी संघाकडून करण्यात आलेली आहे.

विक्री दरापेक्षा सातत्याने खरेदी दर वाढवून दिला जात असल्याने संघाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुदान दिल्यास हा तोटा कमी होण्यास मदत होईल.

याबाबतची मागणी पासलकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेली आहे

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधदूध पुरवठाशेतकरीराज्य सरकारगाय