Join us

दूध उत्पादकांचे दूध दरांमुळे होताहेत हाल; दुध संकलन केंद्र मात्र मालामाल

By रविंद्र जाधव | Published: June 16, 2024 5:09 PM

दूध दर नेमके कुठे झाले आहेत कमी ..

या वर्षाचा सुरूवातीला दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलने झाली. ज्यातून मार्ग काढत दूध उत्पादक शेतकरी बांधवांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्यात आले. त्यासोबतच २७ रुपये लिटर ३.५ - ८.५ दूध दर करण्यात आला. एक महिन्याच्या या निर्णयाला पुढे मुदत वाढ मिळाली. मात्र त्यातच लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने हे अनुदान बंद झाले. अवघ्या तीन महिन्यांच्या आता हे अनुदान बंद झाले. 

यातच अलीकडे पंजाब मध्ये वेरका च्या 'मिल्कफेड' ने म्हशींचा दूध खरेदी दरात मोठा बदल केला. ज्यात म्हशीच्या दुधाची किंमत प्रति किलो फॅट ८१० रुपये वरून ८२० रुपये प्रति किलो केली आहे. तर गायीच्या दुधाची किंमत प्रति किलो फॅट ₹ ७७० वरून ₹ ७८० प्रति किलो करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा दूध उत्पादन खर्च वाढला आहे. वाढत्या तापमानाचा दुधाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यानुषंगाने लुधियाना प्लांटचे सरव्यवस्थापक सुरजित सिंह भदौर यांनी या दर वाढीची घोषणा केली. 

लागोपाठ गुजरात मध्ये देखील दूध दरांत काहीअंशी वाढ झाली. मात्र असं असतांना देखील आपल्याकडे अध्यापही अवघे २२ -२५ रुपये लिटर दूध खरेदी सुरू आहे. मात्र त्या उलट दुसरीकडे दूध संकलन करणार्‍या केंद्र चालकांचे कमिशन मात्र टिकून आहे. 

सोबतच लस्सी, पनीर, आईस्क्रिम यांचे देखील दर गेल्या महिन्यांच्या उष्णतेसोबत वाढले आहे. मात्र तरीही दुधाच्या दरात वाढ काही झाली नाही. तेव्हा पंजाबचा आदर्श घेत सरकार दरबारी काही पाऊले उचलले जातात का ? या कडे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. अन्यथा हा दूध उत्पादक तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथील एकनाथ डोंगरे यांच्याशी याविषयी चर्चा केली असता. दूध उत्पादक असलेले डोंगरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या अनेक  भागात चारा आणि पाणी टंचाई निर्माण झाली होती. अशा परिस्थितीला देखील दूध उत्पादकांनी तोंड देत संघर्ष केला. असे असूनही दूध दर जर असेच कायम राहणार असतील तर दूध उत्पादक शेतकरी हतबल होईल परिणामी गाई, म्हशी विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर येईल. 

दिवसाला २० दूध डेअरी ला घालून सुध्दा सकाळ संध्याकाळ दूध काढणे, चारा - पाणी, स्वच्छ्ता, आदींची एका माणसाची मजुरी देखील सध्याच्या २२ -२५ रुपये दराने मिळत नाही. तरीही शेतकरी संघर्ष करत आहे. अशा वेळी शासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा दूध उत्पादकांचा आता मोठा उद्रेक होऊ शकतो. - संदीप अंजिनाथ जाधव (दूध उत्पादक रा. शिऊर ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर). 

हेही वाचा - पतीच्या दुग्ध व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप

टॅग्स :दूधगायशेतकरीशेतीपंजाबशेती क्षेत्रदुग्धव्यवसाय