Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगताय.. या जिल्ह्यात दूध उत्पादन सव्वा लाख लीटरने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 13:59 IST

पावसाळ्यात चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दैनंदिन दूध उत्पादन १ लाख ३५ हजार लीटरने वाढले आहे.

सदानंद औंधेमिरज : पावसाळ्यात चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दैनंदिन दूध उत्पादन १ लाख ३५ हजार लीटरने वाढले आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे १५ लाख लीटर दूध उत्पादन होते.

यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. शहरात निर्यातीसह दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी वापर होतो. पावसाळ्याच्या चार महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध असल्याने १० ते १५ टक्के उत्पादनात वाढ होते. हा दुधासाठी पुष्ठकाळ मानला जातो.

या वर्षीही उन्हाळ्यात घटलेले दूध उत्पादन जून महिन्यात वाढल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. या वर्षी मार्चमध्ये १७ लाख व दैनंदिन दूध उत्पादन होते. उन्हाळ्यात पाणी व चारा टंचाईमुळे मे महिन्यात १४ लाख ४१ हजार लीटर सरासरी दूध उत्पादन होते.

जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर १५ लाख ७५ हजार सरासरी दूध उत्पादन आहे. जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनापैकी दूध ६० टक्के गायीचे आहे. जिल्ह्यात नदीकाठावरील चार तालुक्यांत मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दुधाचा व्यवसाय आहे.

जिल्ह्यात चितळे, थोटे आदी १२ खासगी दूध डेअऱ्या व १७ मल्टीस्टेट संघ दूध संकलन करतात. खासगी डेअऱ्यांचे दररोज नऊ लाख लीटर दूध संकलन असून, त्यापैकी एकट्या चितळे डेअरीचे दररोज आठ लाख लीटर संकलन आहे.

दूध व दूध पावडरला दर नसल्याने जुलैपासून तीन महिने गाय दुधाला प्रतिलीटर पाच रुपये शासनाचे अनुदान असल्याने, दुग्ध विकास कार्यालयाकडे दररोज दूध उत्पादनाच्या नोंदी सुरू आहेत.

जिल्ह्यातील दूध उत्पादन एप्रिल - १६ लाख २ हजारमे - १४ लाख ४१ हजारजून - १५ लाख ७५ हजार

दरवर्षी पावसाळ्यात दूध उत्पादन वाढते. यावेळी दूध अनुदान योजनेमुळे शंभर टक्के दुधाची नोंद होत असल्यानेही दूध उत्पादनात वाढ दिसत आहे. अतिरिक्त दुधाचा प्रश्न सगळीकडेच असल्याने दुधाला पाच रुपये व दूध पावडर निर्मितीला लीटरला दीड रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे. - नामदेव दवडते, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायसांगलीदूध पुरवठापाऊस