Milk Production :
नागपूर : चांगले दुधाळू पशू ओळखून कृत्रिम गर्भाधान आणि भ्रूण प्रत्यारोपणसारख्या तंत्रामुळे एकापेक्षा अधिक दूध देणारे पशू तयार केले जाऊ शकतात. त्याचा लाभ दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
'विदर्भात दूध व्यवसायाच्या संधी' या विषयावर परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. एनडीडीबीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या परिषदेत 'मदर डेअरी'चे पशुचिकित्सक डॉ. वसीम हन्नुरे, एनडीडीबीचे ओएसडी व महाव्यवस्थापक डॉ. संजय गोरानी व वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ. व्ही. श्रीधर यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. वसीम हन्नुरे यांनी दुभत्या प्राण्यावरील विविध रोगांवर पारंपरिक पद्धतीने उपचार, यावर मार्गदर्शन केले. दुभत्या जनावरांमध्ये स्तनदाह, कासदाह असे आजार आढळतात. त्यावर हळद, चुना, लिंबू, मुळा, कोरफड यासारख्या पारंपरिक घटकांचा वापर करून उपचार केला जाऊ शकतो.
त्यामुळे जनावरे बरी तर होतातच शिवाय, त्यांच्या दुधातील रासायनिक औषधांचे प्रमाण कमी होते. दूध व्यवसाय करताना उत्पादन कसे वाढवता येईल व खर्च कसा कमी करता येईल, याचाही शेतकऱ्यांनी विचार करावा. डॉ. व्ही. श्रीधर यांनी 'ई- गोपाल' या ॲपबद्दल माहिती दिली. सुत्रसंचालन सुधीर दिवे यांनी केले.