गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढू लागला आहे. थंडीमुळे जशी माणसे आजारी पडू लागली आहेत, त्याचप्रमाणे त्याचा त्रास जनावरांनाही होऊ लागला आहे. दूध उत्पादनावरही परिणाम झाला असून, दूध संघांच्या संकलनात घट होऊ लागली आहे.
सध्या पारा १३ डिग्रीपर्यंत खाली आल्याने थंडी वाढली आहे. आठवड्याभरात सर्दी, खोकला, डोकेदुखीचे रुग्ण वाढले आहेत. याचा फटका लहान मुले व वयोवृद्धांना अधिक बसतो. आता माणसांबरोबर जनावरांनाही त्याची झळ बसत आहे.
गोठ्यात थंड वातावरण, त्यात ओली वैरण अधिक असल्याने जनावरांच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे दूध उत्पादनही कमी झाले आहे. साधारणत: अर्ध्या लिटरने जनावरे दूध कमी देऊ लागल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अति थंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात. त्यामुळे जनावरे लंगडतात, तसेच त्यांची त्वचा खरबरीत होते. दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही. त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या दर्जावरही परिणाम होतो.
अधिक वाचा: Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर
पोट गच्च, रवंथ मंदावते
थंडीमुळे बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होते, तर रवंथ प्रक्रिया मंदावते. सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होते.
थंडीचा कडाका यावर्षी जरा अधिक असून, त्यामुळे गायी व म्हशींच्या दुधावर परिणाम झाला आहे. सरासरी अर्ध्या लिटरने दूध कमी झाले आहे. - विवेक चौगुले, दूध उत्पादक शेतकरी, म्हाकवे
थंडीमुळे जनावरे दूध कमी देतात हे जरी खरे असले तरी ‘गोकुळ’च्या संकलनावर सध्या तरी काही परिणाम दिसत नाही. - शरद तुरंबेकर,संकलन अधिकारी, गोकुळ