Join us

Milk Rate : दसरा-दिवाळी होणार गोड; शेतकऱ्यांना मिळणार दूध दरात दोन रुपयांचा फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 4:40 PM

दूध उत्पादक संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk Producer Farmer) दोन रुपये दूध दर (Milk Rate) फरक देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (कात्रज डेअरी) ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये दूध दर फरक देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

यासह आर्थिक वर्ष २०२३-२४चे व्यापारीपत्रक, नफा-तोटा पत्रक, नफा वाटणी, वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण अहवाल, अंदाजपत्रक यावेळी सादर करण्यात आले. तर नवीन दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाकरिता आधुनिक मशिनरीसह प्रकल्प उभारणी व नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत, दूध पुरवठा बंद असलेल्या संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत, लेखापरीक्षकांची नेमणूक करणे आदी निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आले.

या आर्थिक वर्षात संघाला ३ कोटी १ लाख ५७ हजार निव्वळ नफा झाला आहे, मागील वर्षी संघाची तरतूद नसताना दूध फरकापोटी १ रुपया दूध दर फरक अदा करण्यात आला होता.

त्यानुसार संघाने सन २०२३-२४ मधील घातलेल्या दुधावर १ रुपया प्रतिलिटर दूधदर फरक अदा करण्याची तरतूद केली होती. मात्र, संस्था प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून असमाधान व्यक्त करत तीन रुपये दूधदर फरक देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या मान्यतेने दोन रुपये फरक देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या दूध दर फरका पोटी संघाला १३ ते १४ कोटी रुपये अदा करावे लागणार आहेत.

दूध उत्पादक सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष व संचालक मंडळाने उत्तर दिल्यानंतर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेमध्ये उत्कृष्टपणे कामकाज करणाऱ्या १६ आदर्श दूध संस्थांची निवड करण्यात आली. त्यांना प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह व स्वच्छ दूध उत्पादनास प्रोत्साहन तसेच पशुखाद्याची सर्वात जास्त विक्री करणाऱ्या ११ दूध संस्थांची निवड करण्यात आली होती.

आमच्याशी व्हॉटसअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा.

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायगायशेतकरीशेतीशेती क्षेत्रकात्रजपुणे