सोलापूर : गायदूध खरेदी दरात येत्या २६ फेब्रुवारीपासून एक रुपयाची वाढ करीत शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३३ रुपये देण्याचा निर्णय सोनाईसह राज्यातील काही दूध संस्थांनी घेतला आहे.
डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत पाचवेळा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही दुसरी दरवाढ आहे. जागतिक बाजारात बटर व दूध पावडरचे दर घसरल्याच्या कारणामुळे गाय दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली होती.
दूध उत्पादक शेतकऱ्याकडून दराच्या घसरणीमुळे नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला होता.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अनुदान बंद झाले. त्यानंतर हळूहळू दूध खरेदी दरात वाढ करण्यास सुरुवात झाली. इंदापूरच्या सोनाई दूध संघाने एक-एक रुपयाची वाढ केल्यानंतर राज्यातील इतर दूध संघांनीही दूध खरेदी दरात वाढ केली होती.
नोव्हेंबर महिन्यात गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर २८ रुपये होता तो ११ फेब्रुवारीपासून ३२ रुपये झाला तर २६ फेब्रुवारीपासून ३३ रुपये व वाहतूक कमिशन दोन रुपये असे ३५ रुपयांचे दरपत्रक काढण्यात आले आहे.
आता चार महिने तरी..- ऐन उन्हाळ्यात मागील वर्षी दूध खरेदी दरात अचानक दूध संघांकडून कपात करण्यात आली होती.- शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना दूध संघांनी हात वर करीत सरकारकडे बोट दाखवून रिकामे झाले होते.- राज्य सरकारने यावर अनुदानाचा उतारा दिला होता. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने दूध संघांनी सरकारला कोंडीत पकडले होते.- आता जसजसा उन्हाळा येत आहे तसतसे दूध खरेदी दर वाढत आहेत. आता उन्हाळ्याचे चार महिने तरी दर घसरतील असे वाटत नाही.
यापुढेही दूध खरेदी दरात वाढच होईल. आता दर कमी होतील अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण दूध पुरवठा केला तर त्यापटीत दरही मिळेल. गाईचा दूध खरेदी दर आम्ही वाढविला तर राज्यातील इतर दूध संस्थाही दरात वाढ करतील. यामुळे म्हैस दूध खरेदी दरही वाढण्याचे अपेक्षित आहे. - दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध इंदापूर
आता वरचेवर गाय दूध खरेदी दरात वाढ होत राहील. १० मार्चपर्यंत दूध खरेदी दर प्रतिलिटर ३५ रुपये होईल. त्यानंतरही दूध खरेदी दरात वाढ होईल. शेतकऱ्यांना यातून चार पैसे मिळतील. सतत गाय दूध खरेदी दर किमान ३५ रुपये राहता ही दक्षता सर्वांनी घ्यावी. - प्रकाश कुतवळ, सचिव, महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटना
अधिक वाचा: गाय म्हैस व्याल्यानंतर चारा खाते, रवंथ करते पण भरडाच खात नाही; असू शकतो हा आजार? त्वरित करा उपचार