Join us

दुध अनुदान दिल्याने काय फरक पडत नाही; दुध दरात पुन्हा प्रतिलिटर ५ ते ६ रुपयांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 1:37 PM

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने, दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

अशोक डोंबाळेसांगली : गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने, दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पशुखाद्याच्या दरात ५० किलो पोत्याला १०० ते १५० रुपये वाढले असून, गायीच्या दुधाचे दर प्रति लीटर ५ ते ६ रुपयांनी उतरले आहेत.

ग्रामीण भागात शेतीपुरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. दुभत्या गाईच्या माध्यमातून शेतीला शेणखत उपलब्ध होते. ज्या शेतकऱ्यांकडे घरचा चारा उपलब्ध आहे, त्यांना दुग्ध व्यवसाय परवडतो. मात्र, विकत घेऊन जनावरांना चारा घालणे परवडणारे नाही, पशुखाद्याच्या दरात वाढ व दूध दर कमी, अशा विचित्र परिस्थितीमुळे दुग्ध व्यवसाय तोट्याचा ठरू पाहत आहे. जानेवारी, २०२३ मध्ये गोळी पेंडीचा दर ५० किलोच्या पोत्यास १,५५० रुपये दर होता. यामध्ये १५० रुपयांची वाढ होऊन प्रति पोते १,७०० रुपये दर झाला आहे.

अधिक वाचा: शेतकरी बांधवांनो, या तंत्रज्ञानाचा वापर करून झटपट बनवा हिरवा चारा

शहराजवळील मोठे दुग्ध व्यावसायिक, दूध डेअरी चालकांना १,६२० रुपयांना पेंडीचे पोते मिळत आहे. शेंग पेंडीला जानेवारी, २०२३ मध्ये प्रति पोते २,८०० ते २,९०० रुपयांना शेतकऱ्यांना मिळत होते. सध्या पोत्याचा ४०० ते ३०० रुपये दर वाढला आहे. खाद्याच्या किमती वाढल्याने जादा किमतीत खाद्य खरेदी करावे लागत आहे. दुधाचे दर ५ ते ६ रुपयांनी घसरले आहेत. एकूण परिस्थिती पाहता दुग्ध व्यवसाय अडचणीत असून, यातून शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे आहे.

पशुखाद्य पोत्याचे दर (५० किलो)

पशुखाद्यजाने २०२३जाने २०२४
गोळी पेंड१,५५०१,७००
शेंग पेंड२,८५०३,२००
भुसा१,१७०१,३५०
मका भरडा१,२५०१,४००
सरकी पेंड१,२००१,२५०

छोटे पशुपालक तोट्यातगेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर लीटरमागे ५ ते ६ रुपयांनी घसरले असून, यापूर्वी प्रति लीटर ३३ ते ३५ रुपये दर मिळत होता, तो आता २८ ते २९ रुपये लिटर मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना ८ ते १० दुभती जनावर आहेत, त्यांना थोडे फार उत्पन्न मिळते. मात्र, ज्यांच्याकडे एक किंवा दोन जनावरे आहेत, त्यांच्यासाठी हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे.

अनुदानात शेतकऱ्यांची फसवणूकचमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत संघटनाच्या पदाधिकाऱ्याबरोबर झालेल्या बैठकीत गाईच्या दुधाला ३.२ फॅटला प्रति लीटर २९ रुपये दूध संघांनी दर द्यावा, अधिक ५ रुपये शासन अनुदान असे ३३ रुपये दर निश्चित झाला होता, पण शासन आदेशात ३.५ फॅटला २७ रुपये दूध संघ चालकांनी द्यावेत. अधिकचे ५ रुपये शासन अनुदानाचा निर्णय झाला आहे. शासनाने फॅट ०.३ ने वाढविली असून, दरही कमी केला आहे. यामुळे अनुदानामध्ये शेतकऱ्यांची शासनाने फसवणूकच केली आहे, असा आरोप किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केला आहे.

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायशेतकरीव्यवसायशेतीसरकार