Join us

पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:28 PM

कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. दशमीला बुधवारी सायंकाळपर्यंत तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने यंदा १२ पशुवैधकीय अधिकारी बाजार तळावर नेमले आहेत.

वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. दशमीला बुधवारी सायंकाळपर्यंत तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने यंदा १२ पशुवैधकीय अधिकारी बाजार तळावर नेमले आहेत. बाजारात आलेल्या प्रत्येक जनावरांची तपासणी करण्यात येत आहे. तीन वर्षांनंतर प्रथमच कार्तिकीत जनावरांचा बाजार भरल्याने मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान बाजारासाठी आलेल्या पशुपालकांसाठी बाजार समितीने विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

कार्तिकी, माधी आणि चैत्री यात्रेदरम्यान पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जनावरांचा बाजार भरविण्यात येतो. मात्र २०२१ ते २०२२ या दोन वर्षांत कोरोनामुळे जनावरांचा बाजार भरविण्यात आला नव्हता. मागील वर्षी लम्पी आजाराचा धोका लक्षात घेता बाजार रद्द करण्यात आला होता. २०१९ नंतर पहिल्यांदाच भरविलेल्या जनावरांच्या बाजार राज्यभरातून विविध प्रकारची जनावरे, व्यापारी दाखल झाले आहेत. त्यामळे यंदा पंढरपर बाजार समितीने बाजारात येणाऱ्या पशुपालकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जनावरांची नोंदणी, पिण्यासाठी पाणी रात्रीच्यावेळी लाइटची सुविधा, स्वच्छता, सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

पालखी तळ कमी पडण्याची शक्यता.जनावरांच्या बाजाराचा मुख्य दिवस दशमी, एकादशी, द्वादशी असा आहे. सोमवारपासूनच बाजारात जनावरे दाखल झाली आहेत. सोमवारी ४००, मंगळवारी १५०० हून अधिक तर दशमी दिवशी, बुधवारी ३ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. यंदा जनावरांची आवक पाहता पालखी तळ कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लम्पीची लस घेतल्याचे प्रमाणपत्र सक्तीचेकार्तिक यात्रेत जनावरांच्या बाजारात पशुपालकांनी निरोगी जनावरे खरेदी- विक्रीसाठी आणावीत. जनावरास लम्पी रोगाची लस दिल्याचे प्रमाणपत्र किवा जनावर निरोगी असल्याचा पशुवैद्यकीय डॉक्टरांचा दाखला आवश्यक केला आहे. तसेच जनावरांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे जनावरे कमी दिसत आहेत. मात्र, लम्पीच्या पार्श्वभूमीवर भरलेला हा बाजार मोठ्या प्रमाणात भरला आहे.

शेतकरी, पशुपालकांनी जनावरांच्या बाजारात जागा मिळेल तेथे जनावरे बांधली आहेत. खिलार गाय, संकरित गायी, जर्सी गायी, बैल, म्हैस, रेडे आदी जनावरे विक्रीसाठी आली आहेत. बाजारात तेजीचे चित्र दिसत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. - हरीश गायकवाड सभापती, बाजार समिती

टॅग्स :शेतकरीपंढरपूरबाजारगायलम्पी त्वचारोगसरकार