चारा साठवण्याच्या इतर काही पद्धतीमध्ये मुरघास ही महत्वाची पद्धत आहे त्याच कारण अस कि पारंपारिक पद्धतीमध्ये चारा सुकवून साठवला जातो.
परंतु याद्वारे साठवलेल्या चाऱ्यातील पोषक द्रव्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. मात्र मुरघास पद्धतीने साठवलेल्या चाऱ्यातील ऱ्हास अगदी कमी प्रमाणात होतो तसेच हा चारा जनावरे अगदी चवीने खातात.
मुरघास बनविण्याची खड्डा पद्धत
१) मुरघास तयार करताना जमिनीत खड्डा करून किंवा जमिनीवर सायलो बंकरचे बांधकाम करून घ्यावे लागते.
२) जमिनीमध्ये खड्डा करावयाचा असल्यास त्याचा आकार हा त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी आणि जनावरांची संख्या यावर अवलंबून असतो. खड्डा शक्यतो उंच जागेवर असला पाहिजे, म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही.
३) खड्ड्याच्या भिंती सिमेंटने प्लास्टर करून हवाबंद कराव्यात किवा हे शक्य नसल्यास २०० मायक्रोन प्लास्टिक पेपर खड्ड्यात अंथरावा.
४) त्यानंतर चाऱ्याचे पिक फुलोऱ्यात आल्यावर कापणी करावी आणि चार ५ ते ६ तास सुकू द्यावा म्हणजे त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८० टक्के वरून ६० ते ६५ टक्के पर्यंत कमी होईल.
५) त्यानंतर कुट्टी मशिनच्या सहाय्याने सुकवलेल्या चाऱ्याची एक इंच आकाराचे तुकडे होतील अशा पद्धतीने कुट्टी करून घ्यावी.
६) त्यानंतर प्रती टन चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १ किलो युरिया, २ किलो गुळ, १ किलो मिनरल मिक्चर, १ किलो मीठ आणि १ लिटर ताक यांचे वेगवेगळे मिश्रण तयार करून त्याचे एकत्रित १० ते १५ लिटरचे द्रावण तयार करावे.
७) त्यानंतर खड्यात कुट्टी भरण्यास सुरुवात करावी. चार ते सहा इंचाचा थर देऊन झाल्यावर त्यावर तयार केलेले मिश्रण शिपडावे. त्यानंतर थर चोपून चांगला दाबून घ्यावा.
८) अशा पद्धतीने थरावरथर देऊन खड्डा भरून घ्यावा म्हणजे त्यात हवा राहणार नाही.
९) खड्डा जमिनीच्या वर १ ते १.५ फुट भरून प्लास्टिक कागदाने काळजीपूर्वक झाकून घ्यावा.
१०) त्यावर वाळलेले गवत, उसाचे पाचट, गव्हाचे काड टाकून त्यावर मातीचा थर देऊन खड्डा हवाबंद करावा. मुरघास तयार होण्यास ४५ ते ६० दिवस लागतात.
अधिक वाचा: Janavarantil Gochid : आपल्या गोठ्यात जनावरांना गोचीड होवू नयेत तर मग करा हे सोपे उपाय