''श्वेत क्रांतीचे जनक" डॉ. वर्गीस कुरियन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंती दिनी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस (National Milk Day) साजरा केला जातो. ऑपरेशन फ्लडद्वारे त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (Milk Producer) देश बनवले आहे.
मात्र असे असूनही अध्याप अनेकांना डॉ. वर्गीस कुरियन कोण आहेत ? त्यांचा जीवनपट काय आहे ? यांची अनेकांना माहिती नाही. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत डॉ. वर्गीस कुरियन यांचा जीवनपट.
डॉ. वर्गीज कुरियन यांचा जन्म आणि शिक्षण
डॉ. वर्गीज कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी कोळ्हिकोड, केरळ येथे झाला. त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. केलं. नंतर अमेरिकेत जाऊन धातुविद्याशास्त्रात मास्टर्स पूर्ण केलं. पुढे भारत सरकारच्या शिष्यवृत्तीनुसार त्यांनी आनंद येथील डेअरीत नोकरी सुरु केली.
'ऑपरेशन फ्लड' आणि दूध उत्पादनात क्रांती
वर्गीज कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन फ्लड' योजनेच्या माध्यमातून भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. त्यांनी 'अमूल' डेअरीची स्थापना केली. ज्याद्वारे म्हशीच्या दुधाची भुकटी तयार केली आणि 'नेस्ले'ला टक्कर दिली.
त्रिभुवन भाई पटेल यांच्याशी सहकार्य
१९४९ मध्ये कुरियन आणि त्रिभुवन भाई पटेल यांनी खेडा जिल्हा सहकारी संस्था स्थापली. त्यातून शेतकऱ्यांना दूध उत्पादनात सहभागी करून ग्रामीण विकास साधला.
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि दूध क्रांती
१९६५ मध्ये कुरियन यांना 'नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड'चे अध्यक्षपद देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात दूध उत्पादनात महापूर आला आणि 'ऑपरेशन फ्लड' योजनेला यश मिळालं.
ऑपरेशन फ्लड आणि श्वेत क्रांती
१९७० साली 'ऑपरेशन फ्लड' मुळे भारत श्वेत क्रांतीला सामोरा गेला आणि जगात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश झाला. 'अमूल' चा विकासही कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
पुरस्कार आणि सन्मान
कुरियन यांना रेमन मॅगसेसे, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाले. तसेच ९ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांच्या योगदानाची छाप दुग्ध क्षेत्रात कायम राहिली.