जनावरांच्या आहारातील चाऱ्यामध्ये प्रामुख्याने हिरवा चारा, वाळलेली वैरण, गवत, झाडपाल्याचा समावेश होतो. हिरवा चारा हा जनावरांच्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिरव्या चाऱ्याच्या अनुपलब्धतेमुळे जनावरांची वाढ, उत्पादन आणि पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो.
मात्र वर्षभर सर्वांना हिरवा चारा उपलब्ध नसतो. अशावेळी उपयोगास येणार्या फक्त पाण्याचा किंवा पोषणतत्वयुक्त पाण्याचा वापर करून ट्रे मध्ये धान्याची उगवण व अंकुरणापासून तयार झालेल्या चार्यास हायड्रोपोनिक्स चारा असे म्हणतात.
हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन घेण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून शेड उभारणी करावी लागते. त्यासाठी ९० % शेटनेटचा वापर करावा. शेड उभारणीसाठी बांबू किंवा लोखंडी पाईप किंवा जी. आय. पाईपचा वापर करावा व ट्रे ठेवण्यासाठी रॅकची व्यवस्था करावी. मात्र जमिनीवर पाणी सांडून अस्वच्छ्ता होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच चारा व्यवस्थापणासाठी शेड मध्ये झाऱ्याने अथवा नॅपसॅक पंपाने अथवा स्वयंचलित पद्धतीने मायक्रो स्प्रिंकलर्सचा वापर करून पाणी देण्याची व्यवस्था करावी.
हायड्रोपोनिक्स मका चारा उत्पादन पद्धती
या तंत्रज्ञानाने मका, गहू, बार्ली, ओट इ. तृणधान्याची वाढ करून चारानिर्मिती करता येते. हायड्रोपोनिक्ससाठी २ x १ फूट आकाराच्या ट्रे मध्ये ६०० gm मका लागतो. मका १२ ते २४ तास पाण्यात भिजत ठेवावा. त्यानंतर पाणी काढून टाकावे. बियाणास मोड येण्यासाठी गोणीत/पोत्यात २४ ते ३० तास ठेवावे.
मोड आलेला मका ट्रे मध्ये समान पसरवून तो ट्रे रॅकच्या मांडणीवर ठेवावा. ट्रे वरील मक्यावर ठराविक अंतराने झाऱ्याने/नॅकसॅक पंपाने अथवा स्वयंचलित पद्धतीने मायक्रोस्प्रिंकलर्सचा वापर करून पाणी द्यावे. वातावरणानुसार २ ते ३ तासांच्या फरकाने १ ते २ मिनिटेपाणी द्यावे. उष्ण वातावरणात १ ते २ तासांच्या फरकाने १ ते २ मिनिटे पाणीद्यावे. वरील पद्धतीने ७ ते ९ दिवसांत २० ते ३० सें. मी. उंचीचा हिरवा मका चारा तयार होईल.
Goat Farming शेळी पालनाचे प्रकार व त्यांची माहिती
२० x २० फूट ४०० चौ. फूट जागेत १० जनावरांसाठी चारा तयार करता येतो. एक किलो मका बियांनापासून ७ ते ८ दिवसांत ५ ते ६ किलो हिरवा चारा तयार होतो. एक किलो चारा उत्पादनासाठी साधारणपणे २ ते ३ लिटर पाणी लागते. चारा अतिशय लुसलुशीत, पौष्टिक चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात हा चारा मोठ्या जनावरांना १० ते २० किलो प्रती जनावरे याप्रमाणे खाद्य आणि सुक्या चाऱ्यासोबत दिला जावा. ट्रे मध्ये बियाणे टाकल्यापासून ७ ते ९ व्या दिवशी चारा काढून जनावरांना द्यावा. या पद्धतीत एक किलो चारा उत्पादनासाठी साधारणतः तीन रुपये खर्च येतो.
हायड्रोपोनिक्स चाऱ्यातील पोषणमूल्ये
हायड्रोपोनिक्स हा चारा अत्यंत लुसलुशीत, पौष्टिक व चवदार असून, त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, एन्झाईम आणि सूक्ष्म अन्नघटकांचे प्रमाण भरपूर असते. या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असून, धान्य किंवा इतर चाऱ्यापेक्षा जास्त पचनीय (९० ते ९५ टक्के) असतो.
तसेच धान्यापेक्षा दीड पटीने जास्त प्रथिने वाढतात. धान्याची उगवण होताना एन्झाईम सक्रिय होऊन धान्यातील पिष्ठमय पदार्थ, प्रथिने आणि स्निग्ध घटकांचे जनावरांना लवकर उपलब्ध होतील अश्या सोप्यास्थितीमध्ये रूपांतरीत करतात. दुधाची गुणवत्ता व उत्पादकतेत सुधारणा करते.
हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी
हायड्रोपोनिक्स शेड मध्ये दमट आणि ओलसर वातावरणामुळे बुरशी, जीवाणू वाढण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्यावे. तसेच चांगल्या प्रतीच्या बियाणांचा वापर करावा. बियाणे चांगले धुऊन घेऊनच पाण्यात भिजत ठेवावे. ट्रे मधील चाऱ्याच्या मुळ्या चारा उचलून पाहू नये. प्रत्येक वेळी ट्रे चांगले धुऊन व वाळवूनच वापरावेत. ट्रे धुण्यासाठी कपाते धुण्याचा सोण किंवा क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर करावा.
अधिक वाचा दूध काढतांना हे ठेवा ध्यानी; व्यवसायातून मिळेल हमखास मनी
संपूर्ण शेड नेहमी स्वच्छ ठेवावे. शेड व इतर साहित्य धुण्यासाठी क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर करू शकतो. शेड मध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. योग्य प्रमाणात बियाणांचा व पाण्याचा वापर करावा. शेवाळयुक्त किंवा घाण पाण्याचा वापर करू नये. ट्रेमधून पाण्याचा चांगल्याप्रकारे निचरा होण्यासाठी रॅकमध्ये ट्रेची मांडणी करताना ट्रे ला एका बाजूला हलकासा उतार द्यावा. चारा ट्रेमध्ये जास्त दिवस ठेऊ नये.
हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन तंत्रज्ञानाचे फायदे
कमीत कमी पाण्यात जास्त चारा निर्मिती शक्य होते. हायड्रोपोनिक्स पद्धतीने एक किलो चारा उत्पादनासाठी २ ते ३ लिटर तर पारंपरिक पद्धतीने ६० ते ८० लिटर पाणी लागते. ट्रे मधून वाया जाणारे पाणी एकत्र करण्याची सोय करून इतर झाडांना वापरता येते. कमी पाणी लागत असल्याकारणाने दुष्काळी भागात हे तंत्रज्ञान वापरता येते.
या चारा उत्पादनासाठी जागा फार कमी लागते. १० जनावरांसाठी लागणारा चारा ४०० चौरस फूट जागेत तयार करता येतो. वातावरण कसेही असो, वर्षभर चारा उत्पादन शक्य होते. पारंपरिक चारा उत्पादनासाठी ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. परंतु, यात ७ ते ८ दिवसांत चारा तयार होतो. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेने फार कमी मनुष्यबळ लागते.
दुष्काळी परिस्थितीत किंवा टंचाईकाळात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होते. तयार चारा जनावरे पूर्णपणे खातात. त्यामुळे चारा वाया जात नाही. चारा वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा व खतांचा वापर नसल्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक चारा तयार होतो. काढणीपश्चात आणि साठवणुकीत चाऱ्यातील होणारा पोषणमूल्यांचा ऱ्हास या चाऱ्यात होत नाही. कारण दररोज लागणारा चारा तयार केला जातो.
डॉ. श्रीकांत मोहन खुपसे
सहायक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर
व
डॉ. एन. एम मस्के
प्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर