पशुपालकांना वारंवार भेडसावणारी समस्या म्हणजे गोचीड निर्मूलन होय. या समस्येचा प्रभाव फक्त जनावरांच्या आरोग्यावर नाही तर त्याच्या उत्पादनावरही होतो. म्हणूनच गोचीड निर्मूलनासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
यात जैविक पद्धतीने गोचीड निर्मूलन एक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाय आहे. यामध्ये रासायनिक औषधांचा वापर कमी करून सुरक्षित उपायांचा वापर केला जातो.
करंज तेल, नीम तेल आणि साबणाचा वापर
एक प्रभावी जैविक उपाय म्हणजे करंज तेल, नीम तेल आणि साबण यांचे मिश्रण तयार करणे. यासाठी एक लिटर पाण्यात ४० मिलि करंज तेल, ४० मिलि नीम तेल आणि ४० ग्रॅम साबण मिसळून एक द्रावण तयार करावं. हे द्रावण वासरांच्या अंगावर ३ ते ४ दिवसाच्या अंतराने लावावे. यामुळे गोचीड दूर होतात आणि जनावरांना कोणतेही हानिकारक रासायनिक प्रभाव पडत नाही.
गोठ्यात फवारणी करणे
गोचीड निर्मूलनासाठी गोठ्यात औषधाची फवारणी केली जात असली तरी फ्लेमगन किंवा टेंभ्याच्या सहाय्याने गोठ्याच्या आजूबाजूचा परिसर जाळून गोचीड दूर करणे अधिक प्रभावी ठरते. हे जाळण्याचे काम करताना गोठ्यात असलेल्या लाकडाच्या फटी आणि खाच खळग्यात साठलेले गोचीडसुद्धा नष्ट होतात.
सतत निगराणी आणि उपाययोजना
गोचीडांवर उपाय करत असताना सतत निगराणी ठेवणे आवश्यक आहे. गोचीडांची सर्वच अवस्था (अंड्यांची, लहान गोचीडांची आणि पूर्ण विकसित गोचीडांची) लक्षात घेऊन वेळोवेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दर वेळी औषधे बदलणे
गोचीड निर्मूलनासाठी आज बाजारात अनेक प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. मात्र गोचीडांचे परिपूर्ण निर्मूलन होण्यासाठी एकाच औषधाचा नियमित वापर केल्यास त्या औषधांची सवय गोचीडांना लागते. ज्यामुळे त्याचा परिणाम कमी होतो. यासाठी दर दोन ते तीन महिन्यांनी औषध बदलणे गरजेचे आहे.
जैविक द्रावणामुळे विषबाधा टाळता येते
जैविक पद्धतीने तयार केलेले द्रावण (जसे की करंज आणि नीम तेल) इतर रासायनिक किटकनाशकांप्रमाणे विषबाधा निर्माण करत नाही. त्यामुळे ह्या पद्धतीचा वापर अधिक सुरक्षित असतो आणि पर्यावरणावरही कमी दुष्परिणाम होतो.
हेही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा'