आज पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बैलपोळा साजरा केला जात असला तरी राजेगाव परिसरात बैलाविनाच बैलपोळा साजरा केला जात आहे. राजेगावसारख्या मोठ्या गावात आता फक्त १५-१६ च बैलजोड्या आहेत. आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पूर्वी जुन्या राजेगावमध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. ज्यांच्याकडे जमीन त्यांच्याकडे बैलजोडी हे समीकरण ठरलेले असायचे.
आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैलपोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा भाद्रपद महिन्यात अमावास्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो.
काय सांगते संस्कृती?महाराष्ट्रात बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिबके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणुकीत काढली जाते. यादिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते. गावात आता केवळ पंधरा बैल जोड्या शिल्लक राहिल्या आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडील पशुधन कमी होत चालले आहे.
पूर्वी सरासरी ५०० ६०० बैलजोड्या एकट्या राजेगावमध्ये होत्या. सकाळी बैलांना नदीवर नेऊन अंघोळ घातली जायची. नंतर बैलांना सजवले जायचे. संध्याकाळी सर्व गावातील बैल मारुतीच्या मंदिरासमोर आणत. पाटलांच्या च्या मानाच्या बैलजोडीचा पहिला मान व नंतर इतर, पुढे ग्रामदेवत राजेश्वर मंदिरासमोर दर्शन घेऊन घरी जाऊन विवाहसोहळा साजरा केला जात असे. - धोंडीराम वाघमारे, शेतकरी राजेगाव