Join us

पशूसंवर्धन विभागाच्या योजनांना अर्ज करण्यासाठी उरले केवळ २ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:15 AM

या तारखेला होणार लाभार्थ्यांची यादी तयार...

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनेसाठी आता १५ डिसेंबरपर्यंतची मुदत असून, जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना चालू वर्षात राबविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज स्वीकारणे व जुन्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करून निवड पूर्ण करणे व जिल्हास्तरावर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करण्याची मुदत ८ डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती.

दरम्यान, क्षेत्रीय स्तरावर सध्या व्यापक प्रमाणात सुरू असलेल्या वंध्यत्व निवारण शिबिरादरम्यान विविध जिल्ह्यांतून मुदतवाढ देण्याबाबत पशुसंवर्धन आयुक्तांकडे विचारणा होत होती. त्यानुसार जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज करता यावे म्हणून २०२३-२४ या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांनी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार नवे वेळापत्रक देण्यात आलेले आहे.दिनांक - कामाचा प्रकार

  • १५ डिसेंबरपर्यंत- २०२३-२४ साठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे, जुन्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे.
  • १६ व १७ डिसेंबर - डाटा बॅकअप करणे.
  •  १८ ते २० डिसेंबर- २०२३-२४ च्या लाभार्थ्यांची रँडमायझेशन पद्धतीने प्राथमिक यादी तयार करणे.
  • २२ ते २६ डिसेंबर- २०२३-२४ मधील नवीन प्राप्त अर्जाची जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे.
  • २७ ते २९ डिसेंबर सर्व लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तता करणे.
  • ३० डिसेंबर कागदपत्रे अंतिम पडताळणी
  • ३१ डिसेंबरला पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार होणार

टॅग्स :सरकारी योजनाशेतकरीदुग्धव्यवसाय