ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. २८) देहूतून मार्गस्थ झाला. देहू ते पंढरपूर व परत पंढरपूर ते देहू या मार्गावर पालखीरथ ओढण्याचा व सेवा करण्याचा मान लोहगावच्या सूरज खांदवे यांच्या 'हिरा-राजा' आणि नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या 'मल्हार-गुलाब' या बैलजोड्यांना मिळाला.
चौघडा गाडीसाठी टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या 'नंद्या-संघा' जोडीला मान मिळाला.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा दोन बैलजोड्या निवडण्यात आल्या. एक बैलजोडी पालखी सोहळ्यापुढे चालणाऱ्या चौघडा गाडीसाठी निवडण्यात आली.
दरवर्षी आषाढी वारीतील पालखीरथ ओढण्याचा मान बैलजोड्यांना मिळतो. हा मान आपल्याच बैलजोड्यांना मिळावा, यासाठी अनेक मालक इच्छुक असतात. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रमुखांसोबत सात वारकरी बैलजोडीच्या निवड समितीत असतात.
बैलजोडीची निवड कशी केली जाते?
• बैलजोडी मालक शेतकरी असायला हवा.
• बैलमालकांचे कुटुंब वारकरी आणि माळकरी असायला हवे.
• त्यांचा वारीत सक्रिय सहभाग असायला हवा.
• सोरटी, जर्सी, खिल्लार यापैकी खिल्लार जातीच्या बैलांची निवड केली जाते.
• खिल्लार जातीचे बैल रांगडे असतात. त्यातील कसलेल्या बैलांना प्राधान्य.
• त्यांच्या वशिंडाचा आकार तपासला जातो.
• बैलांची शिंगे सारखी असायला हवीत.
• त्यांच्या पायाला किंवा शरीराला कोणतीही दुखापत नसावी.
• त्यांच्या गुडघे आणि पायांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसावा.
• त्यांच्या पायाची नखे सारखी असावीत.
अधिक वाचा: Khilar खिलार बैलाला स्पर्धेसाठी व शर्यतीसाठी मोठी मागणी