21st livestock census : आपल्या देशातील जनतेची जशी जनगणना केली जाते तशीच पाळीव पशुंची देखील जनगणना केली जाते. यंदाच्या वर्षी २१ वी पशुगणना केली जाणार आहे. त्याचे उद्घाटन २५ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे झाले.
21 Live Stock census या नावाने पशुगणनेचे ॲप्लिकेशनही तयार करण्यात आले आहे. त्यासाठी मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी यावर्षी होणाऱ्या पाळीव पशुगणनेची सर्व माहिती दिली आहे.
त्यानुसार प्रगणक, पर्यवेक्षक आणि पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. परंतु निवडणूक आयोगाने त्याला तुर्तास तरी स्थगिती दिली आहे. महाराष्ट्रात २१ वी पाळीव पशुगणनेचा महुर्त अद्यापही लागेला दिसत नाही. आतापर्यंत तीन वेळा मुहूर्त काढूनही ही गणना पुढे सरकत नसल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पशुसंवर्धन विभागाला नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पशुगणनेला 'ब्रेक' लावण्यात आला आहे.
या पत्रात निवडणूक आयोगाने असे नमुद केले आहे की, पशुगणनेचा कार्यक्रम हा निवडणूक नंतर घेण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता पशुउपयोगी जनगणनेला निवडणूकीचा खोडा लागला आहे.
आचारसंहिता काळात तसेच पुढील आदेश येईपर्यंत पशुगणनेला सुरुवात केली जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतरच पशु गणनेला सुरुवात होणार आहे.
या कार्यक्रमाची प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना 21 Live Stock census या ॲप्लिकेशनची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग या गणनेसाठी सज्ज झाला होता. परंतू आता पशुगणना ही येत्या नवीन वर्षात हाेणार की काय? असा सवाल पशुपालक उपस्थितीत करत आहेत.
ही आहेत कारणे
* पशुगणनेसाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त ठरला होता परंतू नुकतेच निवडणुक आयोगाने पत्र दिल्यामुळे आता हा मुहूर्त पुढे सरकला आहे.
* महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक २० नोव्हेंबर रोजी आहे.
* आचार संहिता ही २५ नोव्हेंबरपर्यंत असल्याने या काळात पशुगणनेस स्थगिती देण्यात आली आहे.
* या काळात अधिकारी निवडणूक कामकाजात गुंतले आहे.
आचारसंहितेनंतर पशुगणनेचा मुहूर्त
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडणूका असल्याने सध्या आचारसंहिता सुरू असल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे या काळात पशुगणनेला स्थगिती देण्यात आली आहे. पशुगणनेचा निर्णय हा २५ नोव्हेंबरनंतर घेण्यात येणार आहे. - डॉ. एन .एस. कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर