Pashu Ganana 2024 : २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस उद्या (२५ नोव्हेंबर) पासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदी प्रजातींची जाती, लिंग व वयनिहाय गणना करण्यात येणार आहे.
पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हिंगोली येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. खुणे, सहायक आयुक्त डॉ. आर. ए. कल्यापुरे यांनी केले आहे.
उद्या (२५ नोव्हेंबर) पासून बुलढाणा आणि हिंगोली या जिल्ह्यात पशुगणना होणार आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. ही पशुगणना २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले आहे. पशुगणनेसाठी नागरी भागाकरिता प्रति ४ हजार कुटुंबामागे १ प्रगणक व १० प्रगणकांमागे १ पर्यवेक्षक, तर ग्रामीण भागाकरिता प्रति ३ हजार कुटुंबामागे १ प्रगणक व प्रति ५ प्रगणकांमागे १ पर्यवेक्षक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागासाठी ७४ आणि शहरी भागासाठी ९ अशा एकूण ८३ प्रगणकांची नियुक्ती पशुगणनेसाठी करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी २२ आणि शहरी भागासाठी ५ असे एकूण २७ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.
प्रगणकाद्वारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची माहिती प्रगणकांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
खरी माहिती द्या !
पशुधनाची माहिती घेण्यासाठी प्रगणक येतील, त्यावेळी पशुपालकांनी त्यांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, दिलेल्या माहितीच्या आधारे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यानुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. शिवाय पशुसंबंधित विविध योजनांचाही लाभ मिळणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती देऊ नये, सर्वांनी पशुगणनेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून पशुगणना प्रारंभ होणार आहे. प्रगणकाद्वारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनासाठी महत्त्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावराची खरी माहिती प्रगणकांना द्यावी. - गुलाबराव खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा.