Join us

Pashu Ganana 2024 : तांत्रिक कारणाने एकविसावी पशुगणना थांबली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:37 AM

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या प्रायोगिक पशूगणना नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने मोहीम सुरू होण्याअगोदरच थांबविण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच हे काम थांबले आहे.

आयुब मुल्लापाच वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या पशुगणनेचे काम लांबणीवर पडले आहे. १ सप्टेंबरला या मोहिमेची सुरुवात होणार होती; परंतु, मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या प्रायोगिक पशूगणना नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने मोहीम सुरू होण्याअगोदरच थांबविण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच हे काम थांबले आहे.

दर पाच वर्षांनी केंद्र सरकार पशुगणना करते. यापूर्वी सन २०१९ मध्ये विसावी पशुगणना झाली होती. चालू वर्षी एकविसावी पशुगणना करण्यासाठी पशू संवर्धन विभागाने मोबाइलद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणीचे नियोजन केले होते.

१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता. परंतु ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात २० राज्यांत घेण्यात आलेल्या प्रायोगिक प्रयत्नात काही चुका समोर आल्या. त्यामध्ये आठवड्याभरात सुधारणा केल्यानंतर मोहीम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत पशुधनात दोन लाखांची वाढ झाल्याचा अंदाज आहे. गतवेळच्या पशू गणनेनुसार जिल्ह्यात म्हैस व गाय यांची संख्या अनुक्रमे ५ लाख ६८ हजार ८८४ व २ लाख ८३ हजार ६३७ अशी एकूण ८ लाख ५२ हजार ५२१ इतकी आहे.

योजनांना मिळणारा वाढता प्रतिसाद, दवाखान्यातून होणारी तपासणी, उपचार तसेच दुधाचे अनुदान वितरण यातून पशुधन वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २८१ प्रगणक व ८२ पर्यवेक्षक यांची पशूगणना मोहिमेसाठी नेमणूक केली आहे.

यातील ग्रामीण भागात २०५ प्रगणक व ६१ पर्यवेक्षक तर शहरी भागासाठी ७६ प्रगणक व २१ पर्यवेक्षक काम करणार आहेत. म्हैस, गाय, शेळी, मेंढी, वराह, कुक्कुट आर्दीची गणना होणार असल्याने नेमके चित्र समोर येणार आहे.

प्रगणक, पर्यवेक्षक यांची निवड करून पशू संवर्धन पंधरवड्यामध्ये त्यांना प्रशिक्षण दिले आहे. मोबाइलद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी पशू पालकांच्या घरोघरी जाऊन केली जाणार आहे. - डॉ. महेश शेजाळ, सहायक आयुक्त, पशू संवर्धन मुख्यालय

टॅग्स :दुग्धव्यवसायगायराज्य सरकारसरकारमोबाइल