पुणे: राज्यात २१ व्या पशुगणनेला सुरुवात होऊन दोन महिने उलटले आहेत. या काळात ५ हजार ६५३ अर्थात सुमारे ११ टक्के गावांमधील पशुगणना पूर्ण झाली आहे.
आणखी सुमारे ५० टक्के गावांमध्ये पशुगणनेचे काम सुरू आहे, तर सुमारे ४० टक्के अर्थात २१ हजार गावांमध्ये पशुगणना अद्यापही सुरू झाली नसल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या पशुगणनेसाठी मोबाइल अॅपचा वापर करण्यात येत आहे. नागपूर विभागातील २ हजार ३६१ गावांमध्ये पशुगणना पूर्ण झाली आहे. देशातील व राज्यातील पशुंची संख्या निर्धारित करण्यासाठी व त्यासंदर्भात धोरण तयार करण्यासाठी सबंध देशभर २१ वी पशुगणना सुरू आहे.
राज्यातही या पशुगणनेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत ही पशुगणना सुरू राहणार आहे. या पशुगणनेत १६ पशुजन प्रजाती तसेच कुक्कुट पक्षांचे जात, वय, आणि लिंगनिहाय सर्वेक्षण करून त्याची आकडेवारी गोळा केली जाणार आहे.
राज्यात यासाठी ५१ हजार ७४५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पशुगणनेसाठी मोबाइल अॅपचा वापर करण्यात येत असून, पशुसंवर्धन विभागाने माहिती गोळा करण्यासाठी प्रगणकांची नेमणूक केली आहे.
पशुगणनेची सद्यस्थिती
राज्यात आतापर्यंत ५ हजार ६५३ गावांमध्ये पशुगणना पूर्ण झाली आहे. एकूण गावांच्या संख्येच्या तुलनेत सुमारे हे प्रमाण १०.९२ टक्के असून, २५ हजार २२ गावांमध्ये पशुगणना सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण संख्येच्या हे प्रमाण ४८.३६ टक्के आहे, तर २१ हजार २५ गावांमध्ये अद्यापही पशुगणना सुरू झालेली नाही. पशुगणना पूर्ण झालेली गावे व सुरू असलेल्या गावांची संख्या ३० हजार ६७५ आहे. गाव संख्येच्या तुलनेत ५९.२८ टक्के प्रमाण आहे. ५,६५३ गावांची पशुगणना पूर्ण झालेली आहे. तर २५,०२२ गावांची पशुगणना सुरू आहे.
विभाग | पशुगणना पूर्ण झालेली गावे | पशुगणना सुरू असलेली गावे |
मुंबई | ६५४ | ४,२३६ |
नाशिक | ३४५ | ४,३६६ |
पुणे | २६२ | ४,५८७ |
संभाजीनगर | ४५२ | २,१७७ |
लातूर | ७६४ | २,१५८ |
अमरावती | ८१५ | ४,३३७ |
नागपूर | २,३६१ | ३,१६१ |