बाबू खामकर
धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरुड येथील सुप्रसिद्ध पेढ्यांची चव पाथरुडसह परिसरातील शेकडो तरुणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानासह परराज्यातदेखील पोहचत आहे.
भूम तालुक्यातील शिर्डी-तुळजापूर या महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थान मार्गावर भूमपासून १८ किमी अंतरावर नगर - शिर्डी रोडवर असलेल्या पाथरुड गावची ओळखच मुळात पेढ्याचे पाथरुड म्हणून आहे. परिसरातील शेतीपूरक व्यवसाय दुधाच्या खवा व्यव्यवसायावरच पूर्णपणे अवलंबून आहे.
पाथरुडसह परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या हजारो लिटर दुधापासून शेकडो किलो खवा दररोज तयार केला जातो. या खव्यापासून पेढाही तयार करण्यात येतो.
पाथरुडसह परिसरातील नान्नजवाडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी, ईराचीवाडी, बेदरवाडी, बागलवाडी अशा अनेक गावांमधील शेकडो तरुणांच्या माध्यमातून हा चविष्ट पेढा महाराष्ट्रातील सप्तशृंगी गढ, कोल्हापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, शिर्डी, माहूर गढ, डहाणू, मुंबई, आळंदी, पंढरपूर, नागपूर अशा राज्यातील प्रमुख मोठ्या देवस्थानासह परराज्यातही पोहचला आहे.
वर्षभर या पेढ्याला ग्राहकाकडून मागणी असते. तसेच उन्हाळ्यातील चैत्र महिन्यात अधिक प्रमाणात मागणी राहते. पाथरुड येथील पेढा व्यवसायामुळे दुग्ध व्यवसाय, खवा भट्टी, पेढा भट्टी व पेढा विक्रेते अशा माध्यमातून हजारोंच्या हाताला काम मिळाले आहे.
या गावांतून येते दूध अन् खवा
पाथरूड येथे अनेकजण पेढा तयार करण्याचा व्यवसाय करतात. यासाठी पाथरूडसह परिसरातील दुधोडी, वडाचीवाडी, उमाचीवाडी, आनंदवाडी, नान्नजवाडी, ईराचीवाडी, बागलवाडी, ज्योतिबाचीवाडी, सावरगाव, बेदरवाडीसह आदी गावांमधून दररोज दूध व खव्याचा पुरवठा होतो.
दररोज चार ते पाच टन उत्पादन
पाथरूड येथे खावा व पेढ्याच्या पन्नासहून अधिक भट्ट्या आहेत. या माध्यमातून दररोज खवा पेढ्याचे चार ते पाच टनापर्यंत उत्पादन होते. उत्पादित पेढ्याचे गोळी पेढा, कुंदा पेढा, तसेच डब्यातील स्वीट पेढा अशा वेगवेगळ्या पद्धतीने ब्रेन्डिंग करून हा पेढा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो.
कुंदा पेढ्याला अधिक पसंती
या भागातील उत्पादक वेगवेगळ्या प्रकारचे पेढे तयार करतात. विशेषः चैत्री यात्रा कालावधीत या पेढ्यांना अधिक मागणी असते. यातील कुंदा पेढा अनेक ग्राहकांच्या पसंतीला उतरल्याचे उत्पादक सांगतात.