गेवराई तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील १२० वाड्या-वस्त्या, गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अद्यापही होत आहे. परंतु, टँकरने पाणी देताना जनावरांचा हिशोबच धरला जात नाही. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. माणसांना पिण्याचे पाणी मिळतेय मात्र जनावरांचे काय? असा प्रश्न पशुपालक करीत आहेत.
तालुक्यातील सिंचनापासून वंचित असलेल्या पूर्व भागातील गावातील स्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली जात आहे. सध्या तालुक्यातील गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ५० हजारांहून अधिक ग्रामस्थ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांतून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत अशी मागणीही होऊ लागली आहे. त्यानुसार तालुका प्रशासन टँकरद्वारे पाण्याची सोय करण्याचे नियोजन करत आहे.
पशुपालक काय म्हणतात.....
परिसरात कुठेही पाणी उपलब्ध नाही. इकडून तिकडून पाणी आणून जनावरांची तहान भागत आहे. चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. उन्हाळ्यात जनावरांच्या पाण्यासाठी प्रयत्न व्हावेत. - आबासाहेब चाळक, शेतकरी, किनगाव
गेवराई तालुक्यात लहान-मोठी अशी एक लाखाहून अधिक जनावरे आहेत. एका मोठ्या जनावराला रोज ४० लिटर पाणी लागते. तर लहान जनावरांना वीस लिटर पाणी लागते. त्यामुळे जनावरांना पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न पशुपालकांना पडत आहे.
चारा छावणी सुरु करावी
यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. गावात आठ-दहा दिवसाला टैंकर येते. टँकरद्वारे मिळणारे पाणी माणसाला पुरत नाही. त्यात गोठ्यातील चार जनावरांना आमच्या वाट्याचे पाणी पाजावे लागते. हिरवा चारा देखील लवकर उपलब्ध होत नाही. शासनाने दुष्काळाची परिस्थिती जाणून घेत तालुक्यात चारा छावणी सुरू करावी.- वैजिनाथ शेजूळ, शेतकरी, खांडवीपाणीटंचाईमुळे जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. मुबलक चारा उपलब्ध होत नाही. हिरव्या चाऱ्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. इकडून, तिकडून पाणी पाणी आणावे लागते. अनेकदा विकत पाणी घेऊनही वेळेवर मिळत नाही. यंदा पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शासनाने जनावरांना देखील पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा पशुधन संकटात येईल. -भाऊसाहेब सिरसाट, पशुधन पालक