आपल्या देशात वराहपालन अनेक शतकापासून होत असल्याचे दिसून येते. तथापि एकुण राष्ट्रीय उत्पन्नात या व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न हे अत्यल्प असल्याचे आढळते. या व्यवसायाची वाढ आपल्या देशात दखल घेण्याइतकी नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे वराह बाबत असणारा दुषित पुर्वग्रह व धार्मिक संवेदनशीलता ही होत. तथापी अलिकडे अनेकजन याचा अनुभव लक्षात घेवून अनेक लोक याकडे आकर्षित होवू लागले आहेत.
कृषी सकल देशांतर्गत उत्पादनापैकी एक चतुर्थांश पशुधन क्षेत्राचे योगदान आहे. या पशुधन प्रजातीमध्ये वराहांना महत्वाचे स्थान आहे. इतर पशुधन प्रजातीच्या तुलनेत वराहपालकांना जलद आर्थिक परतावा मिळण्यास मोठी क्षमता असते. कारण उच्च प्रजनन क्षमता, चांगले खाद्य रूपांतरण कार्यक्षमता, लवकर लैंगिक परिपक्वता आणि दोन पिढीतील अल्प अंतर यासारख्या वैशिष्टयामुळे वराहपालन हा इतर पशुपालनापेक्षा वेगळा ठरतो.
शास्त्रीय दृष्टीने वराह पालन केल्यास खालील ठळक गोष्टी नजरेत भरतात. वरहामध्ये खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता इतर प्राण्यापेक्षा खुपच जास्त असते. मांसात फॉस्फरस व लोह यांचे प्रमाणही तुलनेने अधिक असते. वराह सहा महिन्यात विक्री योग्य होतात. त्यामुळे लवकरात लवकर आर्थिक उत्पन्नास सुरूवात होते. विशेष की, वराहपालनात मादीपासून एकाच वेळी सरासरी ८ ते १० पिल्ले मिळतात.
वराहपालनासाठी जाती :
१) यार्कशायर जात - या जातीचे उगमस्थान यार्कशायर इंग्लीश परगन्यातील असून या जातीचे वराह अंगाने पांढरे असतात. काही प्राण्यामध्ये काळसर रंगछटा असणारे टिपके आढळतात. लांब, समपातळीत असणारी मऊ पाठ, मऊ मुलायम कातडी व केस असून या जातीची जनावरे एकावेळेस अनेक पिलांना जन्म देणारी म्हणून ओळखली जातात. पुर्ण वाढलेल्या नरांचे वजन ३०० ते ४०० किलो तर मादीचे वजन २३० किलो ते ३२० किलो आढळते.
२)विर्कशायर - या जातीचे उगम स्थान इंग्लंड आहे. विर्कशायर जनावरांचा चेहरा काहीसा पसरट थाळीसारखा असून नाक आखुड असते. कान उभे पण पुढील बाजूस झुकणारे दिसतात. शरीराचा रंग काळा असतो. पुर्ण वाढलेल्या नराचे वजन २७४ ते ३२३ किलो. तर मादीचे वजन २०४ ते २९४ किलोपर्यंत आढळते.
३) हॅमशायर - या जातीचे मुळस्थान अमेरीकेत आढळते. हॅमशायर जनावरांचे डोके व शेपटी काळया रंगाची असते. कान उभे असतात. जनावरांचा रंग काळपट असून पाय आखुड असतात. हॅमशायर जातीची जनावरे तुलनेने लहान आकाराची असतात. पुर्ण वाढलेल्या नराचे वजन २५० ते ३२० किलो तर मादीचे वजन २०० ते ३०० किलोपर्यंत आढळते.
४) लँड रेस - या जातीचे मुळ स्थान स्विर्झलंड मधील आहे. शरीरबांधा लांबट, लोंबणारे कान, मध्यम आकाराचे डोके, सरळपटीत असणारा चेहरा या जातीमध्ये आढळतो. आखुड पाय, शरीराचा रंग पांढरा असून कातडीवर काळे टिपके आढळतात. पुर्ण वाढलेल्या नराचे वजन ३०० ते ३५० किलो व मादीचे वजन २०० ते २५० किलो इतके असते.
वराहासाठी आहार व्यवस्थापन : वराहाची पचनसंस्था ही मानव प्राण्यासदृश्य असून वराह रवंथ करत नाहीत. त्यामुळे तंतुमय चाऱ्याचा कार्यक्षमरीत्या त्यांना उपयोग करता येत नाही. आहारात आंबोणाचा वापर अधिक करावा लागतो. तंतुमय चाऱ्याचा वापर कमी करावा लागतो. वराहपालनात होणाऱ्या एकुण खर्चाचा विचार केला तर ७० ते ७५ टक्के खर्च हा आहारावर होतो. खाललेल्या अन्नाचे रूपांतर मांसामध्ये करण्याची क्षमता वराहामध्ये १:३ इतकी वरच्या दर्जाची आढळते.
घरातील उष्टावळ तसेच तत्सम पदार्थाचा उपयोग आहारात व्यवस्थितरीत्या केला जावू शकतो. आहारात तृणधान्याचा वापर लक्षात घेता वराह या बाबतीत मानवाचे स्पर्धक आहेत. उत्पादनासाठी आहारात अधिक उर्जा असणाऱ्या अन्न घटकांना प्राधान्या द्यावे लागते. अधिक उर्जा असणारे अन्न घटक उदा. मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, तांदुळाचे पॉलिश, मोलॅसिस, गव्हाचा कोंडा, हरभरा, वाटाणा, चुन्नी इत्यादीचा समावेश होतो. प्रथिनेयुक्त अन्न घटकांमध्ये भुईमुग पेंड, सोयाबीन पेंड, मोहरी जवस पेंड, तिळाची पेंड इत्यादीचा समावेश होतो.
वरांहासाठी अन्न घटकाची गरज खाद्यामध्ये खालीप्रमाणे अन्न घटक असावेत
प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, मीठ, 'अ' जीवनसत्व, 'ड' जीवनसत्व, बिटा कॅरोटीन मि.ग्रॅ., थायमिन मी.ग्रॅ., जीवनसत्व ब-१२ मि.ग्रॅ. १३.८
पाणी : ताजे , स्वच्छ पाणी पिण्यासाठी जनावरांना मिळायला हवे. प्रत्येक माठ्या जनावरांस ३ ते ५ लिटर पाणी दरदिवशी लागते. वरांहासाठी लागणारे दैनंदिन खाद्य वेगवेगळया वयोमानानुसार, गटानुसार जनावरांना द्यावे लागते. जन्मानंतर एक आठवडयापर्यंत पिल्लांना त्यांच्या आईचे दुध हेच अन्न असून त्यांना दुध पिण्यासाठी दिवसातून ५ ते ७ वेळा मोकळे ठेवावे गरज भासल्यास त्यांना दुध पिण्यासाठी मदत करावी.
वराहासाठी निवारा व्यवस्थापन : वराहासाठी घरे आवश्यक असून त्यांना निवारा चोरांपासून संरक्षण, याबरोबरच कडक ऊन, थंडी, विपरीत हवामान यांचा कमीत कमी त्रास होईल अशी घरबांधणी करणे नेहमीच फायदेशिर असते. परिणामी जनावरांपासून अपेक्षीत उत्पादन मिळण्यास हातभार लागतो. घर बांधणीसाठी जागेची निवड करतांना ती सभोवतालच्या जागेपेक्षा उंचवट्याची निवडावी म्हणजे नैसर्गीक निचरा होईल.
निवारा दळणवळणासाठी सुलभ म्हणजे रस्त्यालगत असावा. त्यामुळे बाजारपेठेशी संपर्क, खाद्य, जनावरे, वाहतूक सुलभपणे करता येते. घरे बांधतांना धार्मिक संवेदनशिलतेचा विचार या व्यवसायासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता याचाही विचार करावा. विज, पाणीपुरवठा या सोयी मुबलक उपलब्ध व्हायला हवेत. वराहासाठी घराचे बांधकाम करतातंना विशिष्ट रचनेकडे लक्ष द्यावे.
घरातील/गोठ्यातील जमीन सिमेंट कॉकीट ची असावी. ती गुळगुळीत न करता तीला लहान खाचा ठेवाव्यात. जेणेकरून जनावरे घसरणार नाहीत व साफसफाई करणे सुलभ होईल.
वराहांना वेगवेगळ्या गटानूसार खालील दर्शविल्याप्रमाणे जागा लागते.
तपशील | गोठ्यातील जागा | बंधिस्त जागा |
प्रौढ नर | ६ ते ७.५ चौ.मी. | ८.८ ते १२ चौ.मी. |
विणार्या मादीसाठी | ७.५ ते ९ चौ.मी. | ८.८ ते १२ चौ.मी. |
वाढत्या वयाची पिल्ले | ०.९ ते १.८ चौ.मी. | ०.९ ते १.२ चौ.मी. |
भाकड माद्या | १.८ ते २ चौ.मी. | १.४ ते १.८ चौ.मी. |
गोठ्यातील गव्हाणीची रुंदी ५० से. मी., लांबी ७५ से.मी. व खोली २० से.मी. ठेवावी. गोठ्यातील गव्हाणीतच पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करावयाची असल्यास गव्हाणी प्रमाणेच मोजमापे असणारी प्लास्टिकची अगर अॅल्युमिनियम ची भांडी वापरावीत. प्रत्येक प्रौढ जनावरास सरासरी ४० ते ५० लिटर पाणी लागते. पाण्याची सुविधा गव्हाणी लगतच किंवा शेडमध्ये करावी.
गोठ्याच्या भिंती : वराहासाठी घरे छप्पराची उंची १० ते १२ फुट तर बाजुची भिंत ६ ते ६.५ फुट असाव्यात. भिंती छप्पर असणाऱ्या मोकळ्या जागेत मजबुत जाळी बसवावी. छप्पर अॅसेबेसटॉस, कौलारू, पत्र्याची असावीत. घरचे दरवाजे सहा बाय तीन आकाराचे व पुरेसे मजबूत असावेत.
वराहाचे गोठ्याचे प्रकार : वराहपालन करतांना जनावरांसाठी असणारे गोठे खुल्या पद्धतीचे बंदिस्त पद्धतीचे किंवा अर्धबंधिस्त पद्धतीचे असतात. प्रत्येक प्रकारच्या गोठ्याचे काही फायदे काही तोटे असतात.
खुली पद्धत : फायदे : घर बांधतांना कमी खर्च येतो. फक्त रात्रीच्या निवाऱ्यापुरती सोय करावी लागते. गोठ्याची सफाई दररोज करावी लागत नाही. गोठ्यात भरपूर उजेड मिळतो. जनावरांना मुक्तपणे फिरता येते. त्यामुळेच आपोआपच व्यायाम होतो.
तोटे : जनावरांसाठी दिले जाणारे खाद्य समुहासाठी जाते त्यामुळे गरजेनुसार खाद्य प्रत्येकाला मिळेलच याची खात्री नसते. रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे मृत्युचे प्रमाण वाढते. प्रतिकुल हवामानानुसार योग्य ते संरक्षण मिळत नाही. गाभन व दुभत्या जनावरांची वैयक्तिकरित्या काळजी घेणे अवघड होते. सर्वात महत्वाचे म्हणजे या पद्धतीच्या गोठ्यास जास्त जागा लागते.
बंदिस्त गोठे : प्रत्येक जनावरांच्या गरजेनूसार काळजी घेणे शक्य होते. योग्य पद्धतीने जनावराचे प्रजनन करता येते. गोठयाची सफाई चांगल्या रीतीने करता येते. त्यामुळे संभाव्य आजारांचा धोका कमी होतो. मृत्युचे प्रमाण कमी होते. जनावरांची शरीरवाढ चांगली होते. या पद्धतीती गोठे बांधण्यासाठी कमी जागा लागते. जनावरांना संतुलित आहार पुरेश्या गरजेनुसार देता येतो. गोठे बांधणीसाठी लागणारी भांडवली गुंतवणुक मोठी असते. या पद्धतीने जनावरांची जोपासना करतांना शास्त्रीय दृष्टीकोनातून जोपासना कशी करावी याची पुरेशी जाण असावी लागते. मजुरांची गरज जास्तीची लागते. जनावरांना मर्यादित व्यायाम मिळतो.
अर्धबंदिस्त पद्धत : बंदिस्त पद्धतीच्या गोठ्यात मिळणारे सर्व फायदे तर मिळतातच शिवाय बंदिस्त पद्धतीपेक्षा कमी खर्च येतो. जनावरांसाठी पुरेसा सुर्यप्रकाश व ताजी हवा मिळते. बंदिस्त पद्धतीपेक्षा या पद्धतीत जनावरांसाठी जास्त जागा मिळत असल्यामुळे व्यायामही पुरेसा होवू शकतो. जसे गोठे बांधणीसाठी लागणारी भांडवल गुंतवणूक जनावरांची शास्त्रीय दृष्या जोपासना कशी करावयाची याची जाण याकडे लक्ष द्यावे लागते.
वराहसाठी गोठे बांधतांना ते कोणत्याही प्रकारचे असले तरी गोठ्यामध्ये जनावरांसाठी पुरेशी बसण्याची / उभे राहाण्याची जागा, खाद्यासाठी योग्य आकाराची गव्हाण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, जनावरांना पुरेसा व्यायाम मिळण्याची व्यवस्था, मलमुत्राची विल्हेवाट लावण्याची सुविधा, यांचा अंतर्भाव करणे आवश्यक असते. याशिवाय फार्मवर खाद्य साठविण्यासाठी सुविधा, वजन करण्याची सुविधा, रेकॉर्ड रूम असणे व्यवसायीक दृष्या नेहमीच फायदेशिर असते.
वराहपालनातील प्रमुख रोग व आजार
१) कॉलरा हा एक साथीचा रोग असून अचानक उदभवणारा या वर्गात मोडतो. वाढत्या वयाच्या जनावरांमध्ये याचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. याचे संक्रमण नाकावाटे, तोंडावाटे, प्रदुषित, खाद्य, चारा या माध्यमातून जनावरांमध्ये फैलावतो. जनावरांची भुक मंदावने, ताप ४१ पेक्षा जास्त येणे, अशक्तपणा येणे, मंद गतीने शरीराची हालचाल, डोळयातून घाण येणे, जनावरांना हागवन, जनावरांना खोकला येणे इत्यादी लक्षणे आढळतात. गंभिर प्रसंगात ७ ते १० दिवसात जनावरे दगावतात.
प्रतिबंधक उपाय : गोठयाची व जनावरांची योग्य रीतीने दैनंदिन स्वच्छता ठेवणे याबरोबरच प्रतिबंधक लस टोचणे आवश्यक असते.
२) लाळ खुरकूत : हा विषाणुमुळे होणारा रोग असून तो साथीच्या रोगाप्रमाणे इतर जनावरांमध्ये निरोगी संक्रमीत होतांना आढळतो. यामुळे जनावरांना ताप येणे, तोंडामध्ये जिभेवर पायाच्या खुरामध्ये फोड येतात. हे फोड वेदनादायक असून प्रसंगी जनावरे चालू शकत नाहीत, खाद्य चारा खात नाहीत. हा आजार जिवघेणा नसला तरी लहान वयातील जनावरे दगावू शकतात.
प्रतिबंधक उपाय : आजारी जनावरे वेगळी ठेवावीत, लागण झालेल्या जनावरांच्या जखमा पोटेशियम परमॅग्नेट ने धूणे, प्रतिजैविक औषधांची इंजेक्शने देणे यासारखे उपाय करावे लागतात.
३) ब्रुसेलोसिस : हा बॅक्टेरीया जीवाणूमूळे होणारा रोग असून या रोगाची लागण झाल्यावर गाभन जनावरे गाभडने, जनावरे वांझ होणे, सांध्यांना सुज येणे हि लक्षणे आढळतात.
प्रतिबंधक उपाय : रोगाची चाचणी करून घेणे व बाधित जनावरे कळपातून काढून टाकणे आवश्यक असते. नविन खरेदी केलेली जनावरे बाधित जनावरांपासून वेगळी ठेवणे आवश्यक असून गोठ्यातील परिसराची स्वच्छता ठेवणे हितकारक असते.
वराहासाठीचे लसीकरण :
रोगाचे नाव | वय | लस केव्हा द्यावी |
कॉलरा | दोन आठवडे | वर्षातून एकदा |
इरेसीप्लॅस | दहा आठवडे | वर्षातून एकदा |
लाळ खुरकत | एक महिना | वर्षातून दोनदा दर सह महिन्याने |
ब्रुसेलोसिस | दोन महीने | आयुष्यात एकदा |
हेमॉरेजीक सेप्टीसेमीया | तीन महीने | दर वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी |
लेखक प्रा. संजय बाबासाहेब बडेसहाय्यक प्राध्यापक (कृषी विद्या विभाग)दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर पिन कोड ४२३७०३
हेही वाचा - राज्यातील नाशिकची ही महिला ठरतेय वराह पालनात अव्वल