सन १९७७ पासून या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या देशात सुरू झाला. तो पहिल्यांदा तामिळनाडू या राज्यात आढळला. आपल्या सांगली जिल्ह्यात देखील या रोगाने अनेक वेळा तोंड वर काढले आहे. आता तरी नियमित कुठे ना कुठे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.
शेळ्या मेंढ्यातील हा रोग अति संसर्गजन्य असल्यामुळे वेळीच काळजी घेतली नाही तर खूप मोठे नुकसान शेळी मेंढी पालकांना सोसावे लागते. त्यासाठी 'लसीकरण' हा एकमेव प्रभावी उपाय आहे. या रोगात ताप येऊन सर्दी खोकला सुरू होतो. पातळ संडास लागते. श्वास घेण्यास त्रास होतो.
विषाणूजन्य आजार असल्यामुळे जर कळपात या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर तात्काळ कळपातील इतर शेळ्या मेंढ्यांना याची लागण होते व शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने शेळ्या मेंढ्यांच्या नाकातील स्त्राव, दूषित चारापाणी, शेणाद्वारे होतो.
वातावरणातील बदल आणि शेळ्या मेंढ्या वरील एकूण ताण, कमी प्रतिकार शक्ती, बाजारासाठी दूरचा प्रवास, बाजारातील अनेक शेळ्या मेंढ्याशीं आलेला संपर्क यामुळे मेंढ्या पेक्षाही शेळ्या त्यातही पाच ते आठ महिने वयोगटातील करडे या रोगाला तात्काळ बळी पडतात.
रोगाची लक्षणे- या रोगात प्रामुख्याने ताप आल्यावर शेळ्या मेंढ्यांना शिंका येतात.- नाकातून स्त्राव वाहतो.- डोळे लाल होऊन त्यातून घाण येते.- श्वास घेण्यास त्रास होतो.- जिभेवर व हिरड्यावर फोड येऊन चट्टे पडतात व तोंडाचा घाण वास येतो.- संडास पातळ होते.- वेळीच उपचार न झाल्यास नाकातील स्त्राव घट्ट होऊन तो पिवळसर होतो.- डोळ्यातील घाणीमुळे पापण्या बंद होतात व खाणे पिणे पूर्ण बंद होऊन अशक्तपणा वाढतो.- शेळ्या गाभण असतील तर गर्भपात देखील होतो पुढे जाऊन पाच ते सात दिवसात मृत्यू ओढवतो.
या विषाणूजन्य रोग असल्यामुळे उपचार करताना लक्षणानुसार उपचार करावे लागतात. जिवाणूंचे दुय्यम संक्रमण टाळण्यासाठी प्रतिजैवके व वेदनाशामक इंजेक्शन पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावेत. तोंडातील जखमा १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेटच्या सौम्य द्रावणाने धुवून घ्यावेत व बोरोग्लिसरीन लावावे.
या रोगात ९०% पर्यंत मृत्यू आढळत असल्यामुळे लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी जंत निर्मूलन करून घेऊन नंतर आठ ते चौदा दिवसांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण करून घेताना एकाच वेळी कळपातील सर्व शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण करून घ्यावे.
गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. गोठ्यात चुना पसरवून किंवा शिंपडून घ्यावा. सोबत ब जीवनसत्व व खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा. मयत शेळ्या मेंढ्या या उघड्यावर न टाकता खोल खड्ड्यात पुरून घ्यावे.
आपल्या जिल्ह्यात मागील पशुगणने नुसार एकूण ४,५४,१२५ शेळ्या व १,३०,७५४ मेंढ्या आहेत. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण हे मोहीम स्वरूपात सलग करण्यात येणार आहे. त्यासाठी शेळी मेंढी पालकांनी स्वतःहून पुढाकार घेउन सर्व शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण करून घ्यावे.
अधिक वाचा: जनावरांतील घटसर्प रोगाची ओळख आणि लसीकरण कसे करावे?