अरुण बारसकर
सोलापूर : संपूर्ण राज्याचे सहकारी व खासगी संघाचे दूध संकलन दीड लाख लिटरपर्यंत असले तरी त्यामध्ये सव्वा लाख लिटरचा वाटा ८ जिल्ह्यात आहे. सहकारी संघाचे सर्वाधिक संकलन कोल्हापूर तर खासगी संघाचे संकलन अहमदनगर जिल्ह्यात होत आहे.
दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने अनुदान देण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. शासनानेच खासगी व सहकारी संघांकडून होणाऱ्या दररोजच्या दूध संकलनाची माहिती एकत्रित केली. मात्र शासनाने केवळ सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दुधाला अनुदान जाहीर केले आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक दूध हे सहकारी संघाला पुरवठा करीत आहेत. खासगी संघाला नाममात्र २७ हजार लीटर दूध दररोज दिले जाते. परराज्यातील दूध संघांनाही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध दिले जाते मात्र ते नाममात्र आहे. या उलट पुणे व अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहे.
अधिक वाचा: कमी खर्चात हायड्रोपोनिक्स पध्दतीने हिरवा चारा निर्मिती व्यवसाय कसा सुरु कराल?
अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल २६ लाख लीटर दूध खासगी संघांना तर सहकारी संघांना साडेसहा लाख लीटर दूध संकलित होते. पुणे जिल्ह्यातही असेच चित्र असून खासगी संघांना २० लाख ३६ हजार लीटर तर सहकारी संघांना सव्वासात लाख लीटर दूध संकलित होते. राज्यात दररोज एक कोटी ४० लाख ते दीड कोटी लीटर दूध संकलन होते त्यापैकी सव्वालाख लीटर दूध आठ जिल्ह्यात संकलित होते. पश्चिम महाराष्ट्रातील ५ तसेच नाशिक विभागातील नाशिक, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
जिल्हा | सहकारी संकलन (लाख.लिटर) | खाजगी संघ संकलन (लाख.लिटर) |
कोल्हापूर | १५.३२ | ०.२७ |
सांगली | ५.३९ | ६.७३ |
पुणे | ७.३१ | २०.३६ |
सातारा | १.५६ | १२.४५ |
सोलापूर | १.७६ | ८.३५ |
अहमदनगर | ६.३३ | २६.०३ |
जळगाव | २.३१ | ०.५४ |
नाशिक | १.०० | ५.०५ |
शासनाने ३४ रुपये दर अगोदरच जाहीर केला आहे. या दराला बांधील राहून ३४ दर देणाऱ्या संघांना प्रतिलीटर ५ रुपये अनुदान द्यायला हवे. ३.२ फॅटला सहकारी संघांनी २९ रुपये व शासन ५ रुपये अनुदान असे ३४ रुपये जाहीर केले आहेत. मात्र एखाद्या दुधाची फॅट ४.० बसली तर संघ २९ रुपयेच देणार का?, हे स्पष्ट झाले नाही, खासगी व सहकारी असे सरसकट अनुदान दिले पाहिजे. - सदाभाऊ खोत, रयत क्रांती शेतकरी संघटना