पुण्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठातील हवामान अद्यावत शेती व पाणी व्यवस्थापन प्रकल्पाने "फ्युचरिस्टिक फार्मिंग 2023" या आंतरराष्ट्रीय परिषदेचे दिनांक 20 व 21 डिसेंबर, 2023 रोजी आयोजन केले होते. या परिषदेमध्ये तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणारे ॲप विकसित करणाऱ्या डॉ. सोमनाथ माने व डॉ. धीरज कणखरे या शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून व मार्गदर्शनातून सदर ॲप तयार करण्यात आलेले आहे.
अशी आहे ॲपची संकल्पना
सध्या जागतिक तापमान वाढ व त्याचा विविध क्षेत्रावरती होणारा परिणाम यावर अनेकवेळा चर्चा होत असते. त्याचप्रमाणे तापमान वाढीचा परिणाम म्हणून उष्माघातामुळे जनावरांवरती खूप विपरीत होताना दिसत आहेत. याचाच विचार करून देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व डॉ. धीरज कंखरे यांनी तपमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला ॲप तयार केले आहे. डॉ. महानंद माने व डॉ. सुनिल कदम या शास्त्रज्ञांचा या मध्ये सहभाग आहे.
दुध उत्पादन वाढणार
जनावरांवरती अनेक प्रकारचे ताण-तणाव असतात. त्यातील उष्माघाताचा ताण जनावरांवर खूप विपरीत परिणाम करतो. विशेष करून उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तपमान वाढ होते, त्यावेळेस जनावरांना उष्माघात होतो व अशा उष्माघात झालेल्या जनावरांचे दूध उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते.
विशेष करून संकरित गाई किंवा विदेशी गाई यामध्ये याचा खूप मोठा परिणाम होऊन दूध उत्पादनामध्ये 30 टक्क्यांपर्यंत घट दिसून येते. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी सदर अँप चा वापर करून शेतकरी योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकणार आहेत असे डॉ. सोमनाथ माने यांनी नमूद केले. सदर ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपल्याला गोठ्यातील अथवा आपल्या परिसरातील तपमान आद्रता यांच्या आधारे निर्देशांक मिळणार असून त्या निर्देशांकाच्या आधारित सल्ला या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.
स्वयंचलित प्रणालीही काम करते
त्यामध्ये जर तपमान आर्द्रता निर्देशांक जास्त वाढला तर त्यानुसार गोठ्यामध्ये फॅन व फॉगिंग सिस्टीम सुद्धा स्वयंचलित होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून उष्माघातामध्ये किंवा तपमान वाढीमध्ये जनावरांचे गोठ्यातील नियोजन, चारा व आहार नियोजन, खाण्याच्या वेळा, पाणी नियोजन,ई. बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कधी मिळणार हे ॲप?
दर ॲप बनवताना विविध मॉडेलचा विचार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ओपन एपीआय चा वापर करून आपण इच्छित स्थळावरील तपमान आर्द्रता याची माहिती घेऊन कृषि -हवामान विभागानुसार निर्देशांक काढता येणार आहे. या निर्देशांकाच्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणावरून त्यांच्या गोठ्यातील अथवा गावातील उष्माघाताची परिस्थिती कळणार आहे.
त्याचप्रमाणे दुसऱ्या मॉडेलमध्ये गोठ्यामध्ये तपमान व आद्रता यांचे सेंसर बसवून आपल्या मोबाईल वर गोठ्यातील माहितीच्या माध्यमातून हा निर्देशांक कळणार आहे व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अलर्ट्स मिळणार आहेत. सदर ॲपचा शुभारंभ मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्यादरम्यान सदरील ॲप शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. सदर ॲप तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व आय.ओ.टी. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.
सदर ॲप पशुपालकांसाठी थोड्याच दिवसात उपलब्ध होणार आहे. गाईमध्ये होणारा उष्माघाताचा परिणाम काही प्रमाणात कमी करण्यास या ॲपमुळे मदत होऊन दूध वाढ होण्यास मदत होईल.
- मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी