Join us

पावसाळ्यात जनावरांमध्ये पोटफुगी कशामुळे? कसे कराल नियंत्रण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:53 AM

सर्वच पशुपालकांनी आपल्या जनावरात कधी ना कधी Janavarantil Potfugi पोटफुगी अनुभवल असणार आहे  तसा हा सर्वसाधारण आजार आहे. पण याकडे दुर्लक्ष झाले तर मात्र जीव घेणे ठरू शकते.

सर्वच पशुपालकांनी आपल्या जनावरात कधी ना कधी पोटफुगी अनुभवल असणार आहे  तसा हा सर्वसाधारण आजार आहे. पण याकडे दुर्लक्ष झाले तर मात्र जीव घेणे ठरू शकते. वर वर अत्यंत सोपा घरगुती उपचाराने बरा होऊ शकणारा हा आजार असला तरी पशुपालकांनी काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. 

हा आजार पचनसंस्थेची निगडित आहे. सोबत त्वरित उपचाराची गरज असणारा हा आजार आहे हे निश्चित. आम्लधर्मीय अपचन, विषबाधा, सर्पदंश, यासारख्या त्वरित उपचाराची गरज भासणाऱ्या आजारांपैकी हा एक आजार आहे.

पोटफुगी कशामुळे?- रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये एकूण चार पोट असतात. चारा खाल्ल्यानंतर तो पहिल्या पोटात म्हणजे कोठी पोट (रुमेन) या ठिकाणी येतो.त्या ठिकाणी चारा साठवून त्यावर मित्र जिवाणूंची प्रक्रिया होते.८० ते ९० किलो पर्यंत चारा एका वेळी या पोटामध्ये साठवला जातो.तो परत तोंडात येऊन रवंत प्रक्रियेद्वारे बारीक केला जातो. या पोटात आणि दुसऱ्या पोटात जिवाणू द्वारे त्याचे विघटन होत असते.या विघटनाच्या दरम्यान पोटामध्ये वायू निर्माण होतो. तो तोंडावाटे रवंत करताना व शेण टाकताना बाहेर पडत असतो.पण काही कारणाने हा वायू जास्त निर्माण झाल्यास जर बाहेर पडू शकला नाही तर मात्र जनावरांचे पोट फुगते.

पोटफुगी पावसाळ्यातच का? - आता पावसाळा सुरू होऊन महिना झाला सगळीकडे हिरवे गवत उगवले आहे.आपण अनेक वेळा जनावरे चरायला सोडतो. त्यावेळी हे कोवळे लुसलुशीत गवत जनावरांच्या खाण्यात येते.उन्हाळ्याच्या तुलनेत एकदम आहारात बदल होतो. मुळात जनावरांना काय आणि किती खायचे हे कळत नाही.रवंत करण्याच्या जनावरांच्या जिभेत चव ओळखणारे टेस्ट बडस् नसतात. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चारा खाल्ला जातो.अनेक वेळा आपण उन्हाळ्यात चारा टंचाई मुळे निकृष्ट चारा देतो. तसेच जादा प्रतिनियुक्त चारा देखील काही वेळा दिला जातो.पावसाळ्यात फक्त हिरवा चारा देऊन कोरडा चारा दिला जात नाही.कॅल्शियम जास्त फॉस्फरस कमी प्रमाणात पोटात गेल्यामुळे देखील आतड्यांची हालचाल मंदावते व निर्माण झालेला वायू बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो.

अखाद्य वस्तू आणि पोटफुगी- अनेक वेळा पोटात अखाद्य वस्तू गेल्यावर, आंतरपटलाचा हर्निया, धनुर्वात, अन्ननलिका व जठर याला सूज असेल, जंताचा प्रादुर्भाव झाला तरी देखील पोटफुगी आढळते.लक्षणांचा विचार केला तर जनावर खात पीत नाही.डाव्या बाजूला पोटाचा आकार वाढतो. पोटात दुखायला लागते. जनावर अस्वस्थ होते.मागच्या पायाने जनावर पोटावर लाथा मारते. तोंडाने श्वास घेतला जातो.वारंवार लघवी होते व शेणात बदल होतो.

उपचारयामध्ये सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे अन्न पाणी थांबवणे फार महत्त्वाचे असते  छातीच्या पटलावरील दाब कमी करण्यासाठी जनावर पुढच्या भागासह उंच स्थितीत बांधणे.लाळ काढण्यासाठी तोंडात आडवी काठी बांधावी.सोबत ३०-६० मिली टरपेंटाइन  व २५०-५०० मिली गोडेतेल सावकाश पाजावे व जनावर चालवून आणावे.इतर उपायांमध्ये गॅस काढण्यासाठी सुईचा वापर, ट्रोकार कॅनोला चा वापर किंवा पोटाची शस्त्रक्रिया ही तज्ञ डॉक्टरांच्या कडून करून घ्यावी.

प्रतिबंधात्मक उपाय- प्रतिबंधात्मक उपायांमध्ये रोज क्षार मिश्रण देणे.- कोवळे व जादा प्रतिनियुक्त वैरण जास्त प्रमाणात न देणे.- सोबत नियमित कोरडा चारा देणे. घरी उरलेले शिळे अन्न न देणे. तसेच आहारात अचानक बदल देखील करू नये.- या सर्व उपायांनी आपण आपले जनावर पोटफुगी पासून निश्चितपणे दूर ठेवू शकतो.

 डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधडॉक्टरआरोग्य