अलीकडे सगळेच पशुपालक उच्च वंशावळीची जनावरे सांभाळू लागले आहेत. कमी जनावरातून जादा दूध उत्पादन घेण्यासाठी योग्य चारा, पशु आरोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देऊ लागलेत. भाकड, कमी दूध देणाऱ्या जनावरांना गोठ्यातून हद्दपार करत आहेत. यामुळे नफ्याचे प्रमाण वाढत आहे.
अनेक पशुपालक सजग राहून पशु आरोग्य व्यवस्थापनात प्रतिबंधक उपाययोजना करताना दिसतात. त्यामुळे व्यवसायातील तोटा कमी होताना दिसतो. तरीदेखील पावसाळ्यात नफ्याचे प्रमाण कमी करणारा आजार म्हणून स्तनदाह (मस्टायटिस) दगडी याकडे आपण पाहायला हवे.
स्तनदाह म्हणजे कासेचा आजार. कासेचा ताप हा अत्यंत धोकादायक नुकसान पोहोचवणारा आजार आहे. देशातील एकूण दुग्ध व्यवसायात दरवर्षी जवळजवळ ६००० कोटी पेक्षा जादा नुकसान या रोगामुळे होते.
या रोगाचे रोगजंतू दुभत्या जनावराच्या सडातून कासेत प्रवेश करतात. त्या ठिकाणी त्यांची वाढ होऊन कासेच्या नाजूक पेशींना इजा पोहचवतात. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास दूध उत्पादन घटते. काही वेळा पूर्णपणे सड निकामी देखील होतात.
हा रोग सुप्त अवस्थेत असताना जर ओळखला तर तात्काळ उपचाराने बरा होतो. पण पूर्ण लक्षणे दिसायला सुरुवात झाल्यानंतर उपचाराचा खर्च वाढतो. दूध उत्पादन देखील त्या वेतापुरते मूळ पदावर आणता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. सोबत उपचाराचा खर्च देखील मोठा होतो.
अनेक वेळा गोठ्यात एकाच वेळी अनेक गाई म्हैशींना हा रोग होऊ शकतो. यासाठीच पावसाळ्यातील वातावरण व गोठ्यातील परिस्थिती याचा विचार केला तर पशुपालकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
- कासेची काळजी घेणे ही पहिली महत्त्वाची पायरी आहे. कासेचे आरोग्य टिकवून राहण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवणे महत्त्वाचे आहे.
- प्रत्येक वेळा दूध काढताना सड, कास पोटॅशियम परमॅग्नेटच्या सौम्य द्रावणांने स्वच्छ करून घ्यावे. जेणेकरून कासेच्या बाहेर कातडीवर असणारे सूक्ष्म जीवाणू नष्ट होतील.
- दूध काढल्यानंतर देखील संपूर्ण कास स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी व कोरडी करावी.
- सोबत धार काढल्यानंतर साधारण एक तास जनावर खाली बसू नये यासाठी दावणीत वैरण टाकून ठेवावी.
- नियमित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने खनिजे मिश्रणे द्यावीत.
- शेण तपासून जंतनाशके पाजावीत.
- अनेक वेळा गाय-म्हैस आटवताना पशुपालक काळजी घेत नाहीत. ६० ते ९० दिवस आधीपासूनच गायी म्हैशी योग्य काळजी घेऊन आटवायला हवीत.
- आटवताना प्रतिबंधक औषधे सडात सोडणे आवश्यक आहे.
- नियमित धारा काढताना आधीच्या चार-पाच चिळा दूध बाहेर वेगळ्या भांड्यात काढून फेकून द्यावे.
- नंतरच्या दुधाचे देखील बारीक निरीक्षण करून त्याचा रंग, त्यामधे काही दुधाच्या सूक्ष्म गाठी आहेत का ते पहावे.
- कासेचे तापमान, दुधाचे तापमान हे देखील पहावे. ते नेहमीपेक्षा जास्त असेल तर त्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
- तपासणी अंती काही गैर आढळल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत व होणारे नुकसान टाळावे.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: जनावरांना साप चावला हे कसे ओळखाल? यापासून कसा कराल बचाव