Join us

राष्ट्रीय पशुधन अभियानातून शेतकऱ्यांची संकटमुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:53 AM

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: बदलू शकते. यासाठी त्यांना योजनांद्वारे बळ पुरविले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शेतीवर निर्भर कुटुंबांची संख्या मोठी आहे. पण, वाढत्या संख्येमुळे शेतीचे तुकडे पडू लागले. केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांच्याशी साधलेला संवाद....

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायासाठी स्थिती अनुकूल आहे काय?

उत्तर - होय, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायासाठी स्थिती आता अनुकूल झाली. केंद्र व राज्य या दोन्ही पातळ्यांवर पशुधन पालक शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या अनेक योजना सुरू आहेत. जिल्ह्याचे भौगोलिक वातावरणही योग्य आहे. बरेच शेतकरी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून आहेत. अशावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: बदलू शकते. यासाठी त्यांना योजनांद्वारे बळ पुरविले जात आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाचे नेमके स्वरूप काय?

उत्तर - पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत 2014- 15 पासून राबविणे सुरू आहे. 2021-पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना झाली आहे.

प्रश्न- अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश

उत्तर- रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुची उत्पादकता वाढवणे, एका छत्राखाली मांस, बकरीचे दूध, लोकर, अंडी उत्पादन वाढविणे, वैरण उपलब्धता वाढविणे, प्रती पशुधन उत्पादन क्षमतेत वाढ आणि पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे आदी नावीण्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.

प्रश्न - अभियानातून उद्योजकता विकास शक्य आहे?

उत्तर - होय. उद्योजकता विकास, तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकासासाठी शेतकरी पोर्टलवर अर्ज करू शकतात. त्यासाठी अनुदान मिळते. कुक्कुटपालन 1000 अंड्यांवरील कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनाला 25 लाख रुपये, शेळी- मेंढी पालन युनिट 100 मादी अधिक 5 नर ते 500 मादी 25 नर याासाठी 10 ते 50 लाखांचे अनुदान मिळते. वराहपालन युनिटसाठी 15 ते 30 लाख अनुदान, पशुखाद्य व वैरण मुरघास बेल, वैरणीच्या विटा व टी.एम. आर. निर्मितीला 50 लाखांचे अनुदान दिले जाते.

प्रश्न - राष्ट्रीय पशुधन योजनेचे निकष कोणते ?

उत्तर - पशुधन अभियानातील योजनेसाठी अर्जदार स्वत: किंवा त्यांच्याकडील तज्ज्ञ हे प्रकल्पाशी संबंधित प्रशिक्षित व अनुभवी असावे, अर्जदारास त्याचे खाते असलेल्या बँकेकडून संबंधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र, प्रकल्पासाठी स्वत: ची किंवा भाडेतत्त्वावरची जमीन आवश्यक आहे. अर्जदाराने अर्ज ऑनलाइन सादर करताना कोणती कागदपत्रे सादर करायची याची माहिती ऑनलाइन, तसेच संबंधित कार्यालयात उपलब्ध आहे. जनजागृतीद्वारे याची माहिती गावखेड्यांत पोहोचवली जाते. 

प्रश्न - विविध वैयक्तिक लाभाच्या योजना कोणत्या?

उत्तर - स्थानुसार नावीन्यपूर्ण राज्य व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी म्हशींचे गट, शेळी-मेंढी गट वाटप, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2023-24 या वर्षांत राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यांपैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्यची सुविधा आहे. पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांना योजनांचा लाभ घेता येतो. एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये म्हणून तयार केलेली प्रतीक्षा यादी 2021-22 पासून पुढील पाच वर्ष म्हणजे 2025-26 पर्यंत लागू करण्याची सोय आहे. त्यामुळे शेतकरी या योजनेचा लाभ घ्यावा. 

टॅग्स :शेतीचंद्रपूर