Kisan credit card for dairy and poultry farmers, केंद्र शासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. या याेजनेमुळे पशुसंवर्धन व्यवसायाला संजीवनी मिळाली आहे.
या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय करीत असलेल्या पशुपालकांकडे स्वतःची किंवा भाडेतत्त्वावरील गोठा शेड आवश्यक आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाकरिता लागणारा खाद्य, पशुचिकित्सा खर्च, मजुरी, पाणी, वीज इत्यादीसाठी भांडवली खर्च कर्ज स्वरूपात पुरवठा करण्यात येणार आहे.
हे कॅश क्रेडिट दोन लाखांपर्यंत ७ टक्के व्याजाने व २ लाखांवरील कर्ज ११ टक्के कर्ज स्वरूपात पशुपालकाला उपलव्ध होणार आहे. या कर्जाची परतफेड विहित मुदतीत व नियमित झाल्यास नाबार्डकडून ३ टक्क्यांपर्यंत केंद्र शासन व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच लाभार्थ्याला ४ टक्के दराने कर्ज ज्यांच्याकडे पशुधन आहे, त्यांना पुढील देखभालीसाठी उपलब्ध होणार आहे. ही योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदीकरिता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे.
पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी (शुक्रवारी सुटी असल्यास गुरुवारी) तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे.