पशुधन म्हटले की आहारामध्ये स्वच्छ पाणी, हिरवा तसेच वाळलेला चारा, पशुखाद्य खनिज मिश्रणे यांची अत्यंत गरज असते. असंतुलित तसेच निकृष्ट दर्जाचा हिरवा चारा, तसेच खाद्य खाऊ दिल्याने जनावरांच्या आरोग्यावर व दूध उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येतो.
खर्चात खूप वाढ होऊन जनावरांच्या आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण होतात. संकरित जनावरे तर रोगांना लगेच बळी पडतात आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. निकृष्ट प्रतीचा चारा जनावरांनी खाल्यास जनावरे अशक्त तसेच कुपोषित बनतात.
अॅफ्लाटॉक्सीन बुरशी आहे तरी काय?
भिजलेला, काळा, बुरशीयुक्त वाळलेला चारा, भिजलेले पशुखाद्य, निकृष्ट दर्जाची चारा प्रक्रिया व चाऱ्याची अयोग्य साठवणूक यामुळे पशुखाद्य व चारा यामध्ये 'अॅस्परजिलस' प्रजातीच्या हानिकारक बुरशीची वाढ होते.
याबुरशीपासून खाद्यात 'अॅफ्लाटॉक्सीन' नावाचे विष तयार होते. हे विष खाद्यातून प्रथम जनावरांच्या शरीरात जाते व नंतर दुधात येते आणि त्याचे अनेक गंभीर परिणाम उद्भवतात. असे विषयुक्त दूध मानवी आरोग्यास धोकादायक ठरते त्यामुळे दूध उत्पादकांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे
• मुरघासातील व पाण्याचे प्रमाण लक्षात घेणे.
• मुरघासामध्ये टाकण्यात येणाऱ्या कल्चरचे प्रमाण कमी जास्त होणे.
• बंकरमध्ये मुरघास तयार करतांना पूर्णपणे हवाबंद न करणे.
• मुरघास पिशवीत, खड्डयात किंवा बंकर मध्ये पाणी किंवा हवा शिरणे.
• बॅगेतील मुरघास केल्यानंतर पाच दिवसांनी त्या बॅग मधील हवा बाहेर न काढणे.
• मुरघास तयार झाल्यावर जनावरांना खायला दिल्यानंतर बॅग चांगली बंद न करणे.
• मुरघास तयार करतांना रोगयुक्त किंवा बुरशी लागलेली चारा पिके वापरणे.
• कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ उदा. मोलासेस इत्यादी जनावरांना खाऊ घालने.
• पशुखाद्य तसेच भरड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यास बुरशी लागलेली असल्यास.
• पावसात भिजलेली साठवलेली सरकी पेंड काही दिवसानंतर जनावरांना खाऊ घातल्यास.
• पशुखाद्य किंवा पेंड यांचा पाण्याशी संपर्क आल्यास किंवा खाद्य पावसात भिजल्यास.
• पशुखाद्य, पेंड किंवा धान्याची साठवणूक अति दमट ठिकाणी अधिक काळ करणे.
• चारा पूर्णपणे वाळलेला नसताना रचून ठेवल्यास किंवा वाळलेला चारा पावसात भिजल्यास.
• वाळलेला चारा उदा. ज्वारीचा, बाजरीचा कडबा, मका, कडवळ, गहू, तूर, हरभरा, सोयाबीनचा भुसा पावसात किंवा पाण्याने भिजल्यास.
• हिरव्या चाऱ्यामध्ये रस शोषक कीटकांचा तसेच अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास आणि ते जनावरांच्या खाण्यात आल्यास.
बुरशीयुक्त खाद्याचे जनावराच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
• चाऱ्याचा कुबट वास आल्याने जनावर चारा कमी खाते त्यामुळे दूध उत्पादन कमी होते.
• गर्भाची वाढ पूर्ण वाढ होत नाही, परिणामी गर्भपात होतो.
• खुरांचे विकार जडतात यकृतास इजा होते.
• मुत्रपिंडावर दुष्परिणाम होतात.
• वासरांची वाढ खुंटते.
• दुधातील फॅट व एसएनएफचे प्रमाण कमी होते.
• काससुजी होते त्यामुळे वैद्यकीय खर्च खूप जास्त होतो.
• जनावरांमध्ये माजाच्या तक्रारी निर्माण होतात परिणामी जनावर सांभाळण्याचा खर्च वाढतो.
• गायी अनियमित माजावर येतात तसेच त्या वारंवार उलटतात.
• रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावरे वारंवार आजारी पडतात.