Join us

बाजारात 'ईअर टॅगिंग' नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:25 AM

ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) नसलेल्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतीही नोंद करू नये, अशा स्पष्ट सूचना पशुसंवर्धन विभागाने गुरांच्या बाजार प्रशासनाला दिलेल्या आहेत.

ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) नसलेल्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतीही नोंद करू नये, अशा स्पष्ट सूचना पशुसंवर्धन विभागाने वाशिम जिल्ह्यातील गुरांच्या बाजार प्रशासनाला दिलेल्या आहेत. ४.९१ लाखांपैकी आतापर्यंत केवळ १.६८ लाख जनावरांचे ईअर टॅगिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात २०१९ च्या पशुगणनेनुसार ४ लाख ९१ हजार ६७४ जनावरे आहेत. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल ला

ईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. ही प्रणाली - पशुधनासाठी सर्व प्रकारचे ईअर टॅगिंग रेकॉर्ड करणार आहे. परिणामी, जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यता उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचा तपशील यासारखी माहिती शासनाकडे राहणार आहे.

भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि 'कानावर शिक्के' असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नाहीत, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले होते. २५ जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ १.६८ लाख जनावरांचे ईअर टॅगिंग झाले.

नैसर्गिक आपत्तीत जनावरांची हानी झाल्यास ईअर टॅगिंगअभावी शासकीय मदत मिळणे कठीण होईल, अशी भीतीही वर्तविली जात आहे.

'ईअर टॅगिंग' अभावी लसीकरणही नाही!

ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर जनावरांची खरेदी विक्री बंद करण्यात आली तसेच जनावरांवरील शासकीय उपचारही करता येणार नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार नाही तसेच नैसर्गिक आपत्ती, विजेचा झटका तसेच अन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या कानाला टॅग नसल्यास नुकसानभरपाई मिळणार नाही.

वाशिम जिल्हयात केवळ १.६८ लाख जनावरांचे ईअर टॅगिंग झाल्याचे सांगण्यात येत असल्याने पशुपालकांसह पशुसंवर्धन विभागालादेखील अलर्ट व्हावे लागणार आहे.

जिल्ह्यात पशुधन किती?

कुक्कुट - १, १६, ४७७गाय वर्ग - १,६८,०९१शेळी - १,१९,६१९म्हैस - ५३,८२६वराह - ७,१९३मेंढी - ९,३९४इतर - १७,०७६

जनावरांचे ईअर टॅगिंग अनिवार्य आहे. ईअर टॅगिंग नसल्यास जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार १ जूनपासून बंद करावे, याबाबत गुरांच्या बाजार प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या आकडेवारीनुसार १ लाख ६८ हजार जनावरांचे ईअर टॅगिंग झाले. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुचिकित्सा केंद्रात जावून जनावरांचे ईअर टॅगिंग करून घ्यावे. - डॉ. सुनिल अहिरे, प्रभारी उपायुक्त, पशुसंवर्धन.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारगायवाशिमविदर्भ