महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी दूध व्यवसाय करतात. पण सध्या दुधाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पशुखाद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट केली जाते. घरी उपलब्ध असलेल्या किंवा बाजारातून उपलब्ध होऊ शकणाऱ्या स्वस्त चाऱ्यातून किंवा विविध भाजीपाल्यापासून आपण चाऱ्यावरील खर्च कमी करू शकतो.
पशुव्यवस्थापन करत असताना चाऱ्यावरील खर्च कमी करण्यासाठी घरात वाया जाणारा भाजीपाला, फेकून दिला जाणारा भाजीपाला किंवा शेतमाल याचा वापर केला जाऊ शकतो. पारंपारिक पद्धतीने जो चारा आपण जनावरांना खाऊ घालतो त्यापेक्षा अपारंपारिक पद्धतीने पशुखाद्य जनावरांना दिल्यामुळे त्याचा फायदा होतो. पण या खाद्याचे प्रमाण योग्य असायला पाहिजे.
बाजारातील भाजीपाला
बाजारामध्ये न विकला जाणारा पण चांगल्या स्थितीत असलेला भाजीपाला आपण जनावरांना खाऊ घालू शकतो. त्यामध्ये वांगी, टोमॅटो, बटाटा, कोबी, फुलगोबी अशा प्रकारच्या अनेक भाजीपाल्यांचा सामावेश होऊ शकतो. यामुळे जनावरांना विविध प्रकारचे अन्नद्रव्ये मिळू शकतात.
बाभूळ
ज्याप्रकारे आपण शेळ्यांना बाभूळ ही वनस्पती घाऊ घालतो त्याप्रमाणे गाई किंवा म्हशी अशा जनावरांनासुद्धा आपण बाभळीचा पाला खाऊ घालू शकतो.
संत्रा, मोसंबीचे कातडे
ज्या भागात संत्रे किंवा मोसंबीचे उत्पादन घेतले जाते अशा भागांतील शेतकऱ्यांनी या फळांची साल जनावरांना खाऊ घातल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे जनावरांची प्रतिकारक्षमता वाढते आणि जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
बटाट्याचे साल, वटाण्याचे साल
वेफर्स बनवण्याच्या कारखान्यामध्ये बटाट्याचे साल फेकून दिले जातात. हेच बटाट्याचे साल आपण जनावरांना खाऊ घालू शकतो. त्याचबरोबर वाटाण्याचे सालही आपण जनावरांना खाऊ घालू शकतो. यामुळे जनावरांना जास्त फायदा होतो.
आंब्याच्या कोय
आंब्याच्या हंगामात आपण आंब्याच्या फेकून दिल्या जाणाऱ्या कोयीमधील आतील भाग जनावरांना खाऊ घालू शकतो. कोयीच्या वरचा कडक भाग काढून टाकून उर्वरित भाग जनावरांना फायद्याचा ठरतो.
माहिती संदर्भ - डॉ. प्रशांत योगी (पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार)