Join us

Solapur Dudh Sangh : राज्यातील नामांकित सोलापूर जिल्हा दूध संघ बंद पडण्याच्या मार्गावर; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:39 IST

वैभवाच्या शिखरावर पोहोचलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची गणना राज्यातील नामांकित दूध संघात केली जात होती. मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ आणले होते.

सोलापूर : दुग्धजन्य पदार्थाची सर्व उत्पादने केव्हाच बंद झाली असून पॅकबंद पिशवी विक्रीसाठीही आवश्यक दूध संकलन होत नसल्याने पॅकिंग होईल तेवढीच विक्री करावी लागत आहे.

दरम्यान, ऑगस्टनंतर संचालक मंडळाची मासिक बैठक झाली नसल्याने सोलापूर जिल्हा दूध संघ अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

वैभवाच्या शिखरावर पोहोचलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची गणना राज्यातील नामांकित दूध संघात केली जात होती. मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ आणले होते.

प्रशासकीय मंडळ असतानाच राजकीय हस्तक्षेप करून प्रशासकीय मंडळ हटविण्यासाठी संचालक मंडळ निवडणूक घेण्यात आली. कर्जाच्या बोझाखाली दबलेला दूध संघ संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर सुधारेल, अशी धारणा होती.

मात्र, या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर हे संचालक मंडळ आल्याने ८ मार्च २०२२ पासून वरचेवर संघावर कर्जाचा बोजा अधिकच वाढत गेला. कर्ज वाढत गेले. मात्र, संघाच्या कारभारात सुधारणा झाली नाही.

प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत पनीर, पेढा, सुगंधी दूध, दही व पॅकिंग पिशवी दूध विक्री सुरू होती. मागणी तसा पुरवठा केला जात होता. मात्र, संचालक मंडळाच्या अडीच पावणेतीन वर्षांच्या कालावधीत दुग्धजन्य पदार्थाची उत्पादने बंद झाली आहेत.

पॅकिंग दूध विक्रीसाठी आवश्यक दूधही संकलन होत नाही. मागील महिन्यात पाच हजार लिटरपेक्षा कमी झालेले संकलन आता पाच हजारावर गेले आहे. मागील तीन महिन्यांत संचालक मंडळाची मासिक बैठकही झाली नसल्याचे सांगण्यात आले.

सर्वच संचालकांचे दूध बंद■ सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे दूध संकलन पाच हजार लिटरवर आले आहे. मागील काही महिन्यांपासून दूध संघाच्या सर्वच संचालकांनी दूध पुरवठा बंद केला आहे.■ सध्या केवळ उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील दूध संकलन होत होते. मागील दोन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यातूनही दूध सुरू केले असल्याचे सांगण्यात आले.■ मुंबईची जागा, अक्कलकोट, पंढरपूर व शेटफळ येथील जमीन विक्री करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संघाच्या पुनर्बांधणीचा झालेला प्रयल निष्फळ ठरल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा: Gay Dudh Dar : गाय दूध दर कमी अन् अनुदानही बंद; शेतकऱ्यांना रोज सुमारे एक कोटी रुपयांचा फटका

टॅग्स :दूधदूध पुरवठादुग्धव्यवसायसोलापूरपंढरपूर