उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांवर देखील त्याचा परिणाम होताना दिसतो. गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होतो. सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे. मार्चमध्येच उन्हामध्ये चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
उष्ण हवामानामध्ये आढळून येणाऱ्या बाबी
भरपूर पाणी पिण्याकडे कल, कोरडा चार न खाणे, हालचाली मंदावणे, सावलीकडे स्थिरावणे, शरीराचे तापमानात वाढ, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, उत्पादनात कमी येणे, प्रजनन क्षमता कमी होणे, रोगप्रतिकार शक्ती कमी इत्यादी.
काय करावे
- जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे.
- हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची ऊंची जास्त असावी जोणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील.
- छप्पराला शक्यतो पांढरा चुना रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा/तूराट्या/पाचट टाकावे, ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल.
- परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. मुक्त संचार गोठ्याचा अवलंब करावा.
- गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर यासोबत पंख्याचा वापर करावा.
- दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाणे, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील.
- जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.
- बैलांकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. यावेळी त्यांना पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये मिठाचा वापर करावा.
- उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे शक्यतो थंड वातावरणात त्यांना चारा टाकावा.
- म्हशीच्या कातडीचा काळारंग व घामग्रंथींच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गाईपेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची अधिकची काळजी घ्यावी.
- योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर यूरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आवश्यक दुग्ध उत्पादन मिळवणे शक्य आहे.
- जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषधी पाजावी, जनावरांचे नियमितपणे लाळ्या खुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इत्यादी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.
- पशुखाद्यामध्ये मिठाचे वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ पशुंना संतुलित पशुआहारासोबत खनिज मिश्रणे द्यावेत.
- चाऱ्यामध्ये एकदम बदल करणे टाळावे.
- मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती जागा पाण्याच्या तलावापासून, सार्वजनिक ठिकाणापासून दूर व संरक्षित असावी आणि तेथे या संबंधीच्या आवश्यक माहितीचा फलक असावा.
काय करू नये
- कडक उन्हात जनावरांना चरावयास सोडू नये.
- पाण्याचे लोखंडी हौदामधील गरम झालेले पाणी पाजणे टाळावे.
- जनावरे दाटीवाटीने गर्दीने जवळ बांधू नयेत.
- मृत जनावरांची विल्हेवाट नियमित चराऊ कुरणाच्या ठिकाणी करू नये.
अधिक वाचा: उन्हाळा आला.. तुमच्या जनावरांत ही लक्षणे दिसतायत; होऊ शकतो हा गंभीर आजार