Join us

उन्हाळा आला.. तुमच्या जनावरांत ही लक्षणे दिसतायत; होऊ शकतो हा गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 3:44 PM

दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जनावरांची प्रतिकारकशक्ती कमी होते. जनावरांना तीव्र ताप येतो, चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते, अशी लक्षणे दिसता आहेत.

दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जनावरांची प्रतिकारकशक्ती कमी होते. जनावरांना तीव्र ताप येतो, चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते, अशी लक्षणे असल्यास लाळखुरकत आजाराचा धोका असू शकतो. त्यामुळे लस देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

उन्हाळ्यामध्ये विविध सांसर्गिक रोग प्रादुर्भावाची शक्यता असते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा, गाय व म्हशीमधील लाळखुरकत रोगाचे लसीकरण आणि शेळ्या-मेंढ्यामधील पीपीआर लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लाळ खुरकत रोग अर्थात लाळ्या खुरकत, तोंडखुरी-पायखुरी हा गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यासारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे.

विषाणूचा प्रसार हवेतून, श्वासोच्छासाद्वारे, पशुंच्या पाण्याची भांडी, शेण, मूत्र, दूध चारा, गव्हाणी, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहने, पाळीव प्राणी, नवीन खरेदी केलेली जनावरे यांच्याद्वारे रोगाचा प्रसार होतो.

ही आहेत लक्षणे■ रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर एक ते पंधरा दिवसांत रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसू शकतात.■ पशूना १०२-१०६ अंशपर्यंत तीव्र ताप येतो.■ जनावरे चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते.■ जिभेवर, हिरड्यावर, तोंडातील आतील भागावर, कासेवर, खुरामध्ये फोड येतात.■ एक-दोन दिवसांत हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सरसारखी जखम होते.■ या जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही, जनावरे अशक्त होतात.

अधिक वाचा: लाळ खुरकुत रोगापासून जनावरांचे कसे कराल संरक्षण

टॅग्स :गायदुग्धव्यवसायशेतकरीराज्य सरकारसरकारशेळीपालनदुष्काळ