Join us

उन्हाळा वाढतोय जनावरांना पाण्याबरोबर काय द्याल ज्यामुळे टळेल उष्माघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:16 AM

म्हशींना पाण्यात डुबण्याची सवय असल्यास पाण्यात सोडावे. पाणी पाजण्यासाठी हौद असेल, तर त्यात गूळ व मीठ टाकून काठीने ढवळावे.

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला आहे. या उष्म्यातून जनावरेही सुटत नसल्याचे विदारक चित्र आहे. या उन्हामुळे जनावरांना तडक्या आजारासह उष्माघाताचाही धोका संभवत असल्याने जनावरांना गूळ, मिठाचे पाणी पाजावे, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात ३३ डिग्री सेल्सिअस तापमान होते. एप्रिल महिन्यात ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहत असून, मागील दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये अधिक वाढ झाली आहे. तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या उष्माचा परिणाम जनावरांवरही होणार आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आला आहे.

म्हशींना पाण्यात डुबण्याची सवय असल्यास पाण्यात सोडावे. पाणी पाजण्यासाठी हौद असेल, तर त्यात गूळ व मीठ टाकून काठीने ढवळावे. यातून उन्हामुळे येणारा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

जनावरांच्या उष्माघाताची लक्षणे काय?• जनावरे अस्वस्थ होतात, तसेच जनावरांची तहान, भूक मंदावते.• जनावरे कोणतीही हालचाल न करता बसून राहतात.• पटूंना ८ ते १० तासांनंतर अतिसार होण्याची शक्यता बळावते.• श्वासोच्छवास वाढून धाप लागते.• डोळे लालसर होऊन डोळ्यांतून पाणी येण्यास सुरुवात होते.

हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय• गोठ्यात भरपूर खेळती हवा असावी, गोठ्यात अधूनमधून पाण्याची फवारणी करावी.• गोठ्याच्या छतावर पालापाचोळा, गवत टाकून त्यावर पाणी शिंपडावे. त्यामुळे गोठा परिसर थंड राहतो.• म्हशींमध्ये घामग्रंथींची संख्या कमी असल्यामुळे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी किंवा थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात काही वेळेसाठी डुबून ठेवावे.• पशूना तीन ते चार वेळा थंड पाणी पाजावे. आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.• सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजल्यानंतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत. दुपारी जनावरे सावलीत बांधावीत.• दुपारी हिरवा मका, लसून घास यांसारखी पोषण वैरण द्यावी.

दिवसेंदिवस उष्णतेमध्ये वाढ होत चालली आहे. वाढते तापमान आणि उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पशुंना तीन ते चारवेळा थंड पाणी पाजावे, तसेच जनावरांना कडक उन्हामध्ये बाहेर सोडू नये. - डॉ. आर. पी. नरुटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रत्नागिरी

अधिक वाचा : कमी पाण्यात, कमी खर्चात दुहेरी फायदा देणारं पिक; लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

टॅग्स :दुग्धव्यवसायगायपाणीतापमानदूधशेतकरी