राजाराम लोंढे
कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत मराठवाडा व विदर्भात गावपातळीवर एकाही सहकारी प्राथमिक दूध संस्थेची स्थापना झालेली नाही. या उलट एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ९१३ संस्था नव्याने सुरू झाल्या आहेत.
मराठवाडा व विदर्भातदूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर सोपवली आहे. यासाठी, शासन अनुदानावर तिथे दहा हजार गायी व म्हशी देणार आहे.
राज्याचे दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी विभागाची झाडाझडती सुरू केली आहे. विभागनिहाय प्राथमिक सहकारी दूध संस्था किती? जिल्हानिहाय दूध संकलन किती? याची माहिती गोळा केली आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षात मराठवाडा व विदर्भात एकाही सहकारी दूध संस्थेची नव्याने नोंदणी झाली नसल्याचे निदर्शनास आले.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे या विभागांत दूध व्यवसायाला वाव आहे; पण त्याचे नियोजन नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी येथे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा येथे 'गाव तिथे सहकारी दूध संस्था' स्थापन करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर दिली आहे.
मराठवाडा, विदर्भ ३५ लाख लिटर
राज्याच्या दूध उत्पादनात विदर्भ व मराठवाड्यात केवळ प्रतिदिनी ३५ लाख लिटर उत्पादन होते. त्याच्या दुपटीपेक्षा अधिक दूध पश्चिम महाराष्ट्रात आहे. यासाठी शासनाने येथे अधिक लक्ष केंद्रित केले.
'दुग्ध' विभाग पशुसंवर्धनमध्ये विलीन
राज्य शासनाने दुग्धविकास विभाग नुकताच पशुसंवर्धन विभागात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचे दूध संघांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने येथील कर्मचारी पशुसंवर्धन विभागात, तर काहींना इतर विभागात पाठवले जाणार आहे.
दोन वर्षात नोंदणी झालेल्या दूध संस्था
जिल्हा | २०२२-२३ | २०२३-२४ |
सांगली | ०४ | १४ |
सातारा | ० | ०१ |
कोल्हापूर | ५५६ | ३५७ |
जिल्हानिहाय दैनंदिन दूध उत्पादन, लाख लिटरमध्ये
अहमदनगर - २४.८९
कोल्हापूर - २०.६९
पुणे - १९.३९
सोलापूर - १५.३५
सांगली - ११.५५
नाशिक - ९.१४
सातारा - ९.०१
जळगाव - ४.९७
धाराशिव - ४.९५
बीड - ३.७०
संभाजीनगर - ३.५९
लातूर - ३.१५
नांदेड - ३.०२
धुळे - २.०९
अमरावती - २.०६
बुलढाणा - १.८७
नागपूर - १.८६
जालना - १.६७
भंडारा - १.४०
परभणी- १.३५
यवतमाळ - १.३४
पालघर - १.३०
ठाणे - १.२९
रायगड - १.०१
गोंदिया - १.००
हिंगोली - १.००
अकोला - ०.९८
नंदुरबार - ०.९५
वर्धा - ०.९३
चंद्रपूर - ०.७०
रत्नागिरी - ०.६९
वाशिम - ०.६६
गडचिरोली - ०.४५
सिंधुदुर्ग - ०.४३
मुंबई - ०.२०
अधिक वाचा: वर्षभर टिकून राहणारा हा चारा ठरतोय पशुधनासाठी वरदान