Join us

गुरांच्या देखभालीचा खर्च वाढला; दूध आता २० रुपयांनी महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 3:25 PM

सकस चारा मिळावा यावर शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राचे विशेष लक्ष

हिंगोली येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या शासकीय पशुपैदास केंद्रातील म्हशींच्या देखभालीसह चाऱ्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आता या केंद्राच्या वतीने दुधाचे भाव लिटरमागे २० रुपयांनी वाढविण्यात येणार असून, नागरिकांना आता एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र त्याउलट सर्वसामान्य शेतकरी पाणी आणि चारा टंचाईत असताना देखील त्यांचे दूध अवघे २२-२५ रुपये लिटरने खरेदी केली जात आहे.

शहरातील शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रावर १७७ लहान-मोठ्या म्हशी आहेत. प्रक्षेत्राच्या वतीने म्हशींना आवश्यक चारा, खुराक देण्यासह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नियमित तपासणी करण्यात येते. म्हशींना सकस चारा मिळावा, यावर प्रक्षेत्राचे विशेष लक्ष असते. त्यामुळे येथील दूध शुद्ध, विषमुक्त आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा दावा प्रक्षेत्राच्या वतीने करण्यात येतो.

अलीकडच्या काळात म्हशींची देखभाल, चारा, मनुष्यबळाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे महसुलात वाढ करणे गरजेचे झाले आहे. ही बाब विचारात घेऊन प्रक्षेत्राच्या वतीने दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १ मेपासून ८० रुपये लिटरप्रमाणे दूध विक्री केली जाणार आहे.

पूर्वी ६० रुपये लिटरप्रमाणे मिळत होते दूध

शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राच्या वतीने पूर्वीपासून दुधाची विक्री करण्यात येते. या ठिकाणाहून शहरातील अधिकारीवर्ग, व्यापारीवर्ग व इतर प्रतिष्ठित नागरिक सकाळ - संध्याकाळी दूध नेतात. पूर्वी ६० रुपये लिटरप्रमाणे दूध दिले जायचे. १ मेपासून ८० रुपये लिटरप्रमाणे दूध विक्री करण्यात येणार आहे. येत्या काळात दुधाचे दुधाचे दर शंभर रुपये प्रति लिटर पर्यंत जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दररोज २०० लिटर दुधाचे उत्पादन

पशुपैदास प्रक्षेत्राकडे सध्या १७७ लहान मोठ्या म्हशी असून, यातील जवळपास ४० म्हशी दुभत्या आहेत. या म्हशींपासून सकाळ आणि संध्याकाळी एकूण जवळपास २०० लिटर दुधाचे उत्पादन मिळते. प्रक्षेत्रावर जेवढे दूध निर्माण होते तेवढेच वाटप केले जाते, खासगी ठिकाणी मात्र दूध कमी निर्माण झाल्यास ते पाणी टाकून वाढवण्यात येते.

मात्र प्रक्षेत्रावर तसे न होता जे जे उत्पन्न झाले आहे त्याचे समान भाग करून वाटण्यात येते व पैशांचा व्यवस्थित हिशेब संगणकीय प्रणालीत जपून ठेवला जातो. भेसळ होत नसल्याने हे दूध लहान मुलांना तर खूपच आवडते. येणाऱ्या दिवसात दूध उत्पादनात वाढ करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्रक्षेत्राच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा - सर्वात जास्त दूध देणारी ही शेळी ठरतेय शेळीपालनात फायद्याची

शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राकडे असलेल्या म्हशींना सकस चारा, खुराक तसेच नियमित तपासणी करण्यात येते व भेसळमुक्त दुधाची निर्मिती केल्या जाते. त्यामुळे या ठिकाणचे दूध गुणवत्तापूर्ण असल्याने नागरिकांची पसंती मिळते. अलीकडच्या काळात चारा, खुराकसह देखभाल खर्च वाढल्याने दुधाचे भाव वाढवावे लागत आहेत. यातून प्रक्षेत्राच्या महसूलमध्ये भर पडणार आहे. - डॉ. बाळासाहेब डाखोरे, व्यवस्थापक, पशुपैदास प्रक्षेत्र, हिंगोली.

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायहिंगोली