Join us

राज्यात दुधाची मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 11:34 AM

राज्यात खासगी दूध संघ प्रतिदिनी ७० लाख लिटर गाय दुधाचे संकलन करतात. त्यांची सरासरी दूध खरेदी ३२ रुपये प्रतिलिटर आहे.

श्रावण महिन्यात राज्यासह एकूणच देशांतर्गत बाजारपेठेत दूध, दूध पावडर, बटरची मागणी दुप्पट होते. मात्र, यंदा मागणीच घटल्याने पावडर, बटरच्या दरात मोठी घसरण झाली. पावडरला मागणी नसल्याने खासगी दूध संघाकडून गाय दूध कवडीमोल दराने खरेदी सुरू केली असून दुध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली आहे. 

यंदा मार्चपर्यंत दूध पावडर व बटरला दर चांगले होते. मात्र, केंद्र सरकार दूध पावडर व बटर आयात करणार, अशी अफवा पसरवण्यात आली आणि तेव्हापासून दरातील घसरण थांबेना. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत गाय पावडरचे दर २५० ते २५५ रुपये किलो, तर बटर ३६० रुपये किलो दर आहे. त्यामुळे सहकारी दूध संघांचा पावडर करण्यात प्रतिलिटर अडीच रुपयांचा तोटा होत आहे.

राज्यात खासगी दूध संघ प्रतिदिनी ७० लाख लिटर गाय दुधाचे संकलन करतात. त्यांची सरासरी दूध खरेदी milk rate ३२ रुपये प्रतिलिटर असल्याने त्यांना फारसा फटका बसत नाही.

किमान ३४ रुपये दराचा नुसता अध्यादेशराज्य सरकारने गाय दुधाचा किमान खरेदी दर ३४ रुपये प्रतिलिटर करण्याचा अध्यादेश काढला. मात्र, खासगी दूध संघ राजरोसपणे ३१, ३२ रुपयांनी खरेदी करत आहेत.

कोलकाता, ओडिशामधून मागणीकोलकाता, ओडिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांत नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या कालावधीत दूध व बटरची मागणी वाढते. दूध पावडरची मागणी हळूहळू वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठही थंडचआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी दर कमी आहेत. त्यामुळे निर्यातीचा विषय संपल्याने पावडरचा उठाव होईना.

पावडर दरवाढीत खासगी संघाची भूमिका अडसर शेतकऱ्यांकडून ३१ ते ३२ रुपये लिटरने खासगी दूध संघ दूध घेतात. त्यामुळे इतर सहकारी दूध संघांच्या तुलनेत त्यांना कमी दराने पावडर, बटर विक्री करणे परवडते. दरवाढीत खासगी दूध संघाची भूमिका काही प्रमाणात अडसर ठरत असल्याचे सहकारी संघाचे म्हणणे आहे.

पावसावर राहणार 'प्लस' सीझनचे भवितव्यआपल्याकडे ऑक्टोबरपासून दुधाचा 'प्लस सीझन' (पुष्ठकाळ) सुरु होतो. येथून पुढे दुधाचे उत्पादन वाढते. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सहा महिन्यांतील दर प्रतिकिलोपदार्थ             मार्च                  सप्टेंबरदूध पावडर    ३२० रुपये         २५० रुपयेबटर              ४१० रुपये         ३६० रुपये           

टॅग्स :दूधदूध पुरवठादुग्धव्यवसायशेतकरी