कोकण पट्टयात पावसाची चाहूल लागताच घोड्याच्या पाठीवर संसार लादून घर सोडणारे कोकणातील धनगर बांधव पशुधन जगविण्यासाठी मेंढ्यांचे कळप घेऊन मजल-दरमजल करीत मिरज पूर्वभागात पोहोचला आहे. मेंढ्यांना चरण्यासाठी त्यांचा मराठवाड्यापर्यंत प्रवास होतो.
कोकणातील धनगर बांधवांचा मेंढ्यापालन हा मुख्य व्यवसाय आहे. आठ महिने आपल्या भागात मेंढ्या पालनाचे काम करणारे धनगर बांधव पावसाची चाहूल लागताच स्थलांतराच्या मागे लागतो, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, गडहिंग्लज, मलकापूर, अक्कोळसह कोककणपट्ट्यातील अनेक भागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाचा जोर असतो.
मेंढ्यांना चरण्यासाठी हा कालावधी अडचणीचा ठरतो. पावसाळ्यातील रोगराईपासून बचावासाठी तसेच दलदलीमुळे अडचण होत असल्याने हा धनगर बांधव पावसाळ्यात पशुपालनासाठी सुरक्षित व पावसाचे प्रमाण कमी असलेल्या सांगली, सोलापूर जिल्ह्यात दाखल होतो.
या भागातील शेतकऱ्याकडून या मेंढ्यांना शेतात बसविण्यासाठी मागणी असते, मेंढ्या बसविण्याच्या बदल्यात शेतकऱ्याकडून मेंढपाळांना मोबदलाही दिला जातो. सध्या मिरज तालुक्यात दाखल झालेला मेंढपाळ पावसाचा अंदाज घेत सोलापूरच्या दिशेने जात आहे.
दिवसभर मेंढ्यांना हिंडविल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोकळ्या रानात मुक्काम करतात. एका कळपात दोनशेहून अधिक मेंढ्या असतात, असे दोन ते तीन कळप शेतीत बसल्यास त्याचा खताच्या रूपात शेत जमिनीला मोठा लाभ होतो.
चार महिन्यानंतर लागतात परतीचे वेधकोकण पट्ट्यातील पावसाचा जोर कमी आल्यानंतर शेकडो किलोमीटरच्या पदभ्रमंतीच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीनंतर मेंढपाळ गावाकडे जाण्यासाठी परतीच्या मार्गाला लागतात.